देवगिरी एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावर चालतात उमरीतील कार्यालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 07:14 PM2020-03-03T19:14:14+5:302020-03-03T19:16:30+5:30
नांदेडहूनच अधिकारी, कर्मचारी करतात नित्य नियमाने अपडाऊन
- बी.व्ही.चव्हाण
उमरी : येथील तहसील, पंचायत समिती, कृषी, भूमीअभिलेख, रजिस्ट्री कार्यालय आदी राज्य सरकारच्या अनेक कार्यालयांतील लेटलतीफ अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आहे.
उमरी येथील विविध शासकीय कार्यालयांत कार्यरत असणारे बहुतांशी अधिकारी व कर्मचारी हे नांदेडहून अपडाऊन करतात. काहीजण स्वत:च्या वाहनाने तर काही कर्मचारी देवगिरी एक्स्प्रेस या रेल्वेगाडीने अपडाऊन करतात. त्यामुळे बहुतांश कार्यालये देवगिरीच्या वेळापत्रकावर चालतात, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सोमवारी अनेक अधिकारी व कर्मचारी आपापल्या सोयीप्रमाणे उशिराने कार्यालयात हजर झाले. कार्यालयातील एक दोन खुर्च्या सोडल्या तर सर्वच खुर्च्या रिकाम्या होत्या.
विशेष म्हणजे, येथील तहसील कार्यालयात लेटलतीफ अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या अधिक प्रमाणात दिसून आली. तहसीलदार, सर्व नायब तहसीलदार, पेशकार, शिपाई, अव्वल कारकून आदी कर्मचारी साडेदहा वाजताच्या नंतरच कार्यालयात हजर झाले. तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचे अव्वल कारकून यु.एस. गोणे हे १०़३२ वाजता हजर झाले़ पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ए.बी. गोरे हे १०़४१ ला कार्यालयात आले. तहसील कार्यालयाचे लिपिक व्ही.जी.इंदूरकर हे १०़४४ वाजता कार्यालयात उपस्थित झाले. तहसील कार्यालयाचे शिपाई जकीयोदिन व कोतवाल प्रियंका अनंतवार १०़४२ वाजता, तहसील कार्यालयातील आवक-जावक विभागाच्या जी.एम मोतीपवळे या १०़५३ वाजता, पेशकार आर. बी. मुत्तेपवार १०़४९ वाजता,
पंचायत समिती सांख्यिकी विस्तार अधिकारी बी. डी. काकडे १०़४९ वाजता, मग्रारोहयो विभागाच्या साहाय्यक कार्यक्रम अधिकारी आठवले, गोंडगे १०़५३ वाजता, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोलकुमार आंदेलवाड, साहाय्यक गटविकास अधिकारी नारवटकर, कार्यालयीन अधीक्षक ताटीकांबळे, विस्तार अधिकारी (पंचायत) मुकनर हे चारही जण ९़५७ मिनिटांनी कार्यालयात हजर झाले. एकंदरीत कार्यालयात उशिराने येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून त्यांना प्रशासकीय नियम, शिस्त याचे काहीही देणेघेणे नाही किंवा त्यांचे कोणीच काही करू शकत नाही. अशाच आविभार्वात होते़
अकरा वाजेनंतर कार्यालयात
रोजगार हमी योजना संगणक आॅपरेटर शिंदे १०़०५ वाजता, पंचायत समितीचे वरिष्ठ साहाय्यक आरोळे, कनिष्ठ अभियंता स्वामी, कृषी अधिकारी एस. एन. पठाण, साहाय्यक लेखाधिकारी पी.पी. भुसारी, कनिष्ठ लेखाधिकारी एस. के. माटाळकर हे १०़०७ वा. कार्यालयात आले. तहसील कार्यालयाचे शिपाई अहमद अलीखान १०़१४ वा. तर कोतवाल शेख हे १०़५८ मिनिटांनी कार्यालयात आले. उशिरा आलेले प्रत्येक जण तोंड लपवून कार्यालयात घुसण्याच्या प्रयत्नात होते़ तर ११ वाजेनंतर आलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तर कहरच केला. त्यांनी मात्र कार्यालयात बिनधास्तपणे एन्ट्री केली.