ऑनलाइन शिक्षणपद्धतीपेक्षा ऑफलाइन वर्ग जास्त प्रभावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:18 AM2021-03-08T04:18:01+5:302021-03-08T04:18:01+5:30
समाजशास्त्र अभ्यास मंडळाच्या वतीने ऑनलाइन आणि ऑफलाइन अध्यापन याविषयी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. या अहवालाचे प्रकाशन महाविद्यालयाचे ...
समाजशास्त्र अभ्यास मंडळाच्या वतीने ऑनलाइन आणि ऑफलाइन अध्यापन याविषयी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. या अहवालाचे प्रकाशन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रावसाहेब जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा.स्वाती काटे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या सर्वेक्षणात विविध निरीक्षणे हाती लागली. भावना रेनगुंटवार, सिद्धांत गजभारे, आरती खंडेलोटे यांनी सर्वेक्षणाचे निष्कर्ष मांडले.
ऑनलाइन शिक्षणपद्धतीमुळे शालेय विद्यार्थ्यांच्या स्क्रीन टाइममध्ये वाढ झाली असून, मुलांना मोबाइलचे व्यसन लागण्याचा धोका निर्माण झाला आहे. अभ्यासाशिवाय व्हिडीओ गेम पाहण्याकडे कल वाढत चालला आहे. पालकही मुलं घरातच एका जागी बसून असतात, म्हणून विद्यार्थ्यांच्या अतिरिक्त मोबाइल वापराकडे दुर्लक्ष करत आहेत, अशीही काही निरीक्षणे या सर्वेक्षणातून समोर आली.
मोबाइलला रेंज नसणे, इंटरनेट डाटा स्पीड कमी असणे, केवळ एकतर्फी संभाषणावर भर असणे, विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची सोय नसणे किंवा त्यांचे पूर्ण निरसन न होणे, आर्थिक अडचणींमुळे ग्रामीण भागात मोबाइल उपलब्ध न होणे असे अडथळे ऑनलाइन शिक्षणपद्धतीत आहेत, असे सर्वेक्षण अहवालातून समोर आले.
समाजशास्त्र विभागातील बीए तृतीय वर्षाच्या पंधरा विद्यार्थ्यांनी कोरोना काळातील सोशल डिस्टन्सचे सर्व नियम पाळून नांदेड शहर व परिसरात विविध वस्त्यांत भेटी देऊन हे सर्वेक्षण केले आहे. महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेत, पूर्ण केल्याबद्दल प्रा.स्वाती काटे आणि विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ.रावसाहेब जाधव, उपप्राचार्य डॉ.अशोक सिद्धेवाड, उपप्राचार्य डॉ.बालाजी कोंपलवार यांनी अभिनंदन केले.
सर्वेक्षण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी यावेळी शालेय विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष अध्ययनात साहाय्य केले. इंग्रजी व इतर अवघड जाणाऱ्या विषयांचे स्वतः पुढाकार घेऊन पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.