अबब! २५ शेतात गांजाची झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 01:01 AM2018-12-02T01:01:16+5:302018-12-02T01:02:10+5:30

तालुक्यातील रामपूर (पोतरेड्डी) शिवारात गांजाच्या शेतीचा प्रकार उघड झाल्यानंतर पोलिसांनी १ डिसेंबर रोजी शोधसत्र सुरु ठेवले.

ohhh! ganja found in the 25 farm | अबब! २५ शेतात गांजाची झाडे

अबब! २५ शेतात गांजाची झाडे

googlenewsNext
ठळक मुद्देकिनवट तालुक्यातील रामपूर (पोतरेड्डी) येथील प्रकार

किनवट : तालुक्यातील रामपूर (पोतरेड्डी) शिवारात गांजाच्या शेतीचा प्रकार उघड झाल्यानंतर पोलिसांनी १ डिसेंबर रोजी शोधसत्र सुरु ठेवले. सुमारे २५ शेतात गांजाची झाडे सापडली. कमी पोलीस बळाचा फायदा घेवून काहींनी ३० नोव्हेंबरच्या रात्रीच गांजाची झाडे कापून नेली. काही झाडे जाळूनही टाकली.
एका खबऱ्याने आठ दिवसांपूर्वी गांजाच्या झाडांचा व्हिडीओ व्हायरल केल्यानंतर नांदेड पोलीस खाते खडबडून जागे झाले. तोवर किनवट व स्थानिक गुन्हे शाखेला थांगपत्ताही नव्हता. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी रामपूर (पोतरेड्डी) गाव किनवट पोलिसांच्या मदतीने गाठून ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी छापा मोहीम राबविली.
चारही बाजूने जंगल. माळाच्या कडेला व वस्तीच्या अवतीभवती असलेल्या शेतातील कापसात गांजाची झाडेच झाडे पोलिसांना आढळली. वस्तीला जाण्यासाठी रस्ता नसल्याने तेलंगणातून संपर्क केला जातो. परिसरात एकही शेत असे नाही, की जेथे गांजाची झाडे नाहीत. जवळपास २५ शेतात गांजाची झाडे सापडली. जंगलाच्या शेजारी शेती असल्याने वन्यप्राण्यांपासून पिकांना धोका होवू नये, म्हणून जंगलाच्या उताराच्या बाजूने तारा ओढून रात्रीला वीजप्रवाह सोडला जात होता, हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला. शेतात झोपड्याही आढळल्या. गांजा मोजून देण्यासाठी वजनकाटाही मिळून आला.
गांजाचे ‘बी’ सुद्धा पोलिसांच्या हाती लागले. तांदूळ, हळद, मिरची, बिस्कीट सापडले. पोलिसांच्या छाप्यानंतर वस्तीत शुकशुकाट झाला. एक वृद्धा व अन्य चार दोन महिला वगळता गावात कोणीही नव्हते. पोलिसांचा मोठा ताफा असल्याने परिसराला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते. जवळपास दोन ट्रॅक्टरच्यावर गांजाची झाडे पोलिसांनी जप्त केली. गांजाची झाडे असलेल्या शेतात पांढरे सोने सर्वत्र फुटून होते. कापूस वेचणीच झाली नाही. गांजा पिकवून तो कुठे पाठवला जायचा ? याचा शोध पोलीस घेत आहेत.उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव चौधरी यांच्या उपस्थितीत पोलिसांनी ही कारवाई केली. गांजा जप्तीची मोहीम २ डिसेंबर रोजीही राबविली जाईल, असे संकेत पोलिसांनी दिले.

  • पोलीस अधीक्षक संजय जाधव,अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, किनवटचे उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव चौधरी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि स्थागुशाचे व्ही.डी. दिघोरे, पोलीस उपनिरीक्षक सदानंद वाघमारे, आर.एस. खाडे, डी.के. जांभळीकर, केंद्रे, राजू पांगरीकर, बालाजी सातपुते, घुंगरसिंग टाक यांच्यासह किनवट पोलीस दलाचे पोलीस निरीक्षक दिलीप तिडके, सपोनि विजयकुमार कांबळे, जमादार व्ही.एच. राठोड, जे.के. चौधरी, पोना पी.एस. एकलदरे, ए.जी. गिरी, इस्लापूरचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी पाटील, केजकर, गाडेकर, क्युआरटीचे एम.जे. शंकरे, डी.एम. पवार, एस.एच. घोगरे, सी ४७ चे यु.डी. प्रधान, बी.के. माने यांनी या मोहिमेत सहभाग नोंदविला. यावेळी तलाठी आर.ए. ठाकरे, लिपीक राजू हिवळकरदेखील उपस्थित होते.


माझ्या ३२ वर्षांच्या सेवेत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर गांजाची शेती बघितली. - सदाशिव चौधरी, उपविभागीय पोलीस अधिकारी, किनवट

Web Title: ohhh! ganja found in the 25 farm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.