ऑइल मिल स्फोटात होरपळलेल्या कंपनी मालकाच्या दोन मुलांचा मृत्यू; नांदेड येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 15:36 IST2024-12-07T15:34:07+5:302024-12-07T15:36:11+5:30

नांदेडच्या ‘एमआयडीसी’तील दुर्घटनेत गंभीर जखमी पाचपैकी दोघांचा मृत्यू

Oil mill explosion while accounting; Death of two brothers, death of father | ऑइल मिल स्फोटात होरपळलेल्या कंपनी मालकाच्या दोन मुलांचा मृत्यू; नांदेड येथील घटना

ऑइल मिल स्फोटात होरपळलेल्या कंपनी मालकाच्या दोन मुलांचा मृत्यू; नांदेड येथील घटना

नांदेड : ‘एमआयडीसी’ परिक्षेत्रांतर्गत असलेल्या  तिरुमला ऑइल इंडस्ट्रीजमध्ये असलेल्या एका ऑइल मिलमध्ये १ डिसेंबर रोजी सकाळी ११:३० ते १२:४५ वाजेच्या सुमारास अचानक स्फोट होऊन आग लागली. या आगीमुळे ऑइल मिलचे मालक व भागीदारांसह पाच जण जखमी झाले होते. या दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्या पाचपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना हैदराबाद येथील रूग्णालयात हलविण्यात आले. यातील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हर्षद कोत्तावार व विनोद कोत्तावार अशी मृतांची नावे असून ते दोघे सख्खे भाऊ होते. तर त्यांचे वडील मिल मालक भास्कर प्रल्हाद कोत्तावार यांच्यावर उपचार सुरू आहेत.

प्राप्त माहितीनुसार ‘एमआयडीसी’ परिसरातील तिरुमला ऑइल इंडस्ट्रीजचे मालक व त्यांचे सहकारी भागीदार १ डिसेंबर रोजी सकाळी मिलमध्ये नेहमीप्रमाणे हिशोबाचे कामकाज करीत बसले होते. दरम्यान, ऑइल इंडस्ट्रीजमध्ये अचानकपणे प्रचंड स्फोट झाला. या स्फोटामुळेच ऑइल इंडस्ट्रीजच्या गोदामावरील काही लोखंडी टिनपत्रे उडून बाजूस पडली, तर त्याचवेळी, तिरुमला इंडस्ट्रीजला आग लागली. परिणामी, स्फोट होऊन ऑइल इंडस्ट्रीजला आग लागल्याने लाखो रुपये किमतीचे गोडतेल जळाले. तसेच हिशोबाचे कामकाज करीत बसलेले ऑईल इंडस्ट्रीजचे मालक भास्कर प्रल्हाद कोत्तावार व त्यांचे दोन मुले हर्षद कोत्तावार व विनोद कोत्तावार यांच्यासह सुमित सुधाकर बंडेवार तसेच सुधाकर सूर्यकांतराव बंडेवार हे पाचजण जखमी झाले. 

दरम्यान, भाजलेल्या पाचपैकी भास्कर कोत्तावार त्यांची दोन मुले हर्षद आणि विनोद या तीनजणांची प्रकृती चिंताजनक होती. प्रारंभी, त्यांच्यावर नांदेड शहरातील एका नामवंत रूग्णालयात औषधोपचार करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारार्थ त्यांना हैद्राबाद येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, ५ डिसेंबर रोजी हर्षद कोत्तावार आणि ६ डिसेंबर रोजी विनोद कोत्तावार या दोघा भावांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर त्यांचे वडील भास्कर कोत्तावार यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, हर्षद कोत्तावार, विनोद कोत्तावार यांच्या मृत्यूची वार्ता पसरताच नांदेडच्या औद्योगिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

मोठा अनर्थ टळला
ऑइल मिलला रविवारी सुटी असल्यामुळे या मिलमधील बहुतांश कामगार कामावर नव्हते. त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे. या ऑइल इंडस्ट्रीजचे मूळ भूखंडधारक महेश रेखावार हे आहेत. या जागेवर भास्कर कोत्तावार व सुधाकर बंडेवार हे भागीदारीत ऑइल इंडस्ट्रीज उभारून गोडतेल उत्पादन करीत असल्याची माहिती आहे.

Web Title: Oil mill explosion while accounting; Death of two brothers, death of father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.