अविस्मरणीय! ५० व्या एनिवर्सरीला बँड अन् वरात; वयोवृद्ध आईवडिलांचे मुलांनी लावले पुन्हा लग्न
By भारत दाढेल | Published: May 29, 2024 04:01 PM2024-05-29T16:01:25+5:302024-05-29T16:05:16+5:30
आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवणाऱ्या मुलांच्या डोळ्यात अंजन घालणारा अनोखा लग्न सोहळा; आईवडिलांची घोड्यावरून काढली वरात, बँडपथकावर नाचली वऱ्हाडी मंडळी
नांदेड : वयोवृद्ध आईवडिलांचा सांभाळ करण्याऐवजी त्यांना वृद्धाश्रमात पाठवणाऱ्या मुलांची संख्या वाढत असतानाच पंचाहत्तरीत पोहोचलेल्या आपल्या आईवडिलांच्या लग्नाचा ५० वा वाढदिवस रविवारी धूमधडाक्यात साजरा करणाऱ्या मुलांनी मात्र वेगळा आदर्श निर्माण केला आहे. या वयात वयोवृद्ध आईवडिलांचे मुलांनी पुन्हा लग्न वाजतगाजत लावले.
बिलोली तालुक्यातील गोगलेगाव येथील विठ्ठलराव बुद्धलवाड व राजाई बुद्धलवाड या दाम्पत्यांच्या लग्नाचा ५० वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय त्यांच्या मुलांनी घेतला. मग सुरू झाली लग्न सोहळ्याची तयारी.
गावाला चूलबंद आमंत्रण
बँड पथक, मंडप डेकाेरेशन, गावाला चूलबंद आमंत्रण, सहाशे जणांना मूळ पत्रिका, ऑर्केस्ट्रा, वरातीसाठी घोडे अशी सगळी जय्यत तयारी करण्यात आली. अगदी नवरदेवासाठी शेरवानी, तर नवरीसाठी पैठणी खरेदी करण्यात आली. या लग्न सोहळ्यात जवळपास पंचाहत्तरी पोहोचलेल्या नवरी व नवरदेवाला हळद लावण्यापासून ते मंगलअष्टके म्हणण्यापर्यंत सगळे सोपस्कार पार पडण्यात आले.
नवरी, नवरदेवाची घोड्यावरून काढली वरात
गावातून नवरी, नवरदेवाची घोड्यावरून वरात काढण्यात आली. बँडच्या तालावर वऱ्हाडी बेधुंद होऊन नाचत होते. विशेषत: विठ्ठलराव व राजाई यांची मुले-मुली वरातीत आनंदाने नाचत होते. लग्न मंडपात एकीकडे ऑर्केस्ट्रावर वेगवेगळी गाणी सादर केली जात होती. जशजशी लग्नाची वेळ जवळ येत होती, तसे नवरी, नवरदेव लग्न मंडपात घोड्यावरून पोहोचले.
लग्नसोहळ्याचे कुतहूल व भावनिक उमाळा
नटून थटून आलेले वऱ्हाडी मंडळी हातात अक्षता घेऊन थांबले होते. गाण्याच्या तालासुरावर नवरी, नवरदेव लाजत स्टेजवर पोहोचताच मंगल अष्टके सुरू झाली. अक्षतांची उधळण नवरी, नवरदेवावर केली जात होती. एकमेकांना पुष्पहार घातल्यानंतर सात फेरे व मणीमंगळसूत्र घालून लग्नाचा विधी पार पडला. यावेळी मंडपात टाळ्यांचा गजर व फटक्यांची आतषबाजी करण्यात आली. हा नेत्रदीपक सोहळा पार पडताना मात्र प्रत्येकाच्या मनात या आगळ्या वेगळ्या लग्नसोहळ्याबद्दल कुतूहल व भावनिक उमाळा दाटला होता.
जे सुख मिळाले नाही ते दिले
उतरत्या वयात आपल्या आईवडिलांना जे सुख मिळाले नाही, ते सुख देण्याचा प्रयत्न मुलांनी केला होता. आईवडिलांची सगळी हौस मुलांनी पूर्ण केली होती. पन्नास वर्षांपूर्वी गरिबीचे चटके सहन केलेल्या आईवडिलांना लग्नाच्या वेळी साधी सायकलवरून वरात काढता आली नव्हती. मात्र, आता मुलांनी घोड्यावरून वरात काढून आईवडिलांच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या. केवळ सोपस्कार न करता मुलांनी मोठ्या थाटात विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याची पंचक्रोशीत चर्चा सुरू आहे.
मुलांना कर्तव्याची जाणीव व्हावी
वयोवृद्ध आईवडिलांना मुलांच्या आधाराची गरज असते. पण अनेक मुले आपले कर्तव्यही विसरतात. या विवाह सोहळ्यातून इतर मुलांना आपल्या कर्तव्याची जाणीव व्हावी, हा उद्देश असल्याची प्रतिक्रिया बुद्धलवाड यांच्या मुलाने दिली.