औरंगाबाद-बीड महामार्गावर दरोडेखोरांकडून एकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 12:57 AM2018-03-14T00:57:54+5:302018-03-14T01:00:23+5:30

दगडफेक करून धावती कार थांबताच दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांनी केलेल्या चाकू हल्ल्यात कारमधील एक जण जागीच ठार, तर कारचालक गंभीर जखमी झाला. जवळपास दीड लाखांचा ऐवज लुटून दरोडेखोरांनी पोबारा केला. ही घटना सोमवारी मध्यरात्री औरंगाबाद-बीड महामार्गावरील दाभरूळ-थापटीतांडा शिवारात घडली. दरम्यान, पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी करून तपास सुरू केला आहे.

One killed by dacoits on Aurangabad-Beed highway | औरंगाबाद-बीड महामार्गावर दरोडेखोरांकडून एकाची हत्या

औरंगाबाद-बीड महामार्गावर दरोडेखोरांकडून एकाची हत्या

googlenewsNext
ठळक मुद्देकार लुटली : चालक गंभीर; दीड लाखाचा ऐवज लंपास

लोकमत न्यूज नेटवर्क
पाचोड/आडूळ : दगडफेक करून धावती कार थांबताच दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांनी केलेल्या चाकू हल्ल्यात कारमधील एक जण जागीच ठार, तर कारचालक गंभीर जखमी झाला. जवळपास दीड लाखांचा ऐवज लुटून दरोडेखोरांनी पोबारा केला. ही घटना सोमवारी मध्यरात्री औरंगाबाद-बीड महामार्गावरील दाभरूळ-थापटीतांडा शिवारात घडली. दरम्यान, पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी करून तपास सुरू केला आहे.
सिद्धलिंग रामलिंग कोरे (५५, रा. म्हातारगाव, ता. धारूर, जि.बीड, ह.मु. औरंगाबाद) असे मृताचे नाव असून, गंभीर जखमी झालेले कारचालक सुनील प्रभाकर सुरडकर (३७, रा. जाधववाडी, औरंगाबाद) यांच्यावर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी सांगितले की, एम.बी. पाटील कन्ट्रक्शनचे साईट इन्चार्ज सिद्धलिंग कोरे हे कारने (क्र. एमएच-१२-एचएल -३२५६) परळी येथून सोमवारी रात्री नातेवाईकाकडील लग्न समारंभ आटोपून औरंगाबादला येत होते. सुनील हे कार चालवत होते. दाभरूळ-थापटी तांडा शिवारात कार आली असता महामार्गाच्या बाजूला असलेल्या डोंगरावरून त्यांच्या कारवर अचानक दगडफेक सुरू झाली. चालकाने कार थांबवताच बाजूला दबा धरून बसलेल्या २० ते २५ वयोगटातील अंगात काळ्या रंगाचे फूल शर्ट व जीन्स पॅन्ट घातलेल्या तीन-चार दरोडेखोरांनी या दोघांना बेदम मारहाण सुरू केली. कोरे यांच्या गळ्यातील ६५ हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी, ५० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, मोबाईल व नगदी १५०० रुपये, तसेच कारचालक सुरडकर यांच्याजवळील १६ हजारांचे दोन मोबाईल मनगटी घड्याळ, रोख ४०० रुपये, असा एकूण एक लाख ३४ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल हिसकावून घेऊन दरोडेखोरांनी पोबारा केला.
छातीत व डाव्या पायावर चाकूने खोल वार केल्यामुळे कोरे रक्तबंबाळ होऊन जागीच गतप्राण झाले. यावेळी प्रतिकार करणाºया कारचालकाच्या उजव्या पायावरही दरोडेखोरांनी जबर वार करून त्यांना गंभीर जखमी केले.
पाचोड पोलिसांनी घटनास्थळावरून चाकू हस्तगत करून अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध कलम ३०२, ३९४, ३४ नुसार गुन्हा दाखल केला. मंगळवारी सकाळी पोलीस अधीक्षक डॉ. आरतीसिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड, ‘स्थागुशा’चे पो.नि. सुभाष भुजंग, उपनिरीक्षक विवेक जाधव, जफर पठाण, बाळू पाथ्रीकर, गणेश जाधव, संजय भोसले, राहुल पगारे, गणेश गांगवे, रमेश सोनवणे यांच्यासह ठसे तज्ज्ञांनी भेट देऊन पाहणी केली व जखमींची भेट घेऊन विचारपूस केली. सिद्धलिंग कोरे यांच्यावर परळी येथे मंगळवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
जखमी अवस्थेत चालकाने
कार आणली घाटीत
गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या कार चालकाने त्याच कारमध्ये मयत सिद्धलिंग कोरे यांना टाकून औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात आणले व घटनेची माहिती पाचोड पोलिसांना दिली. लगेच मध्यरात्री पाचोडचे सपोनि. महेश आंधळे, उपनिरीक्षक गोरक्ष खरड, प्रदीप एकसिंगे, सहायक फौजदार कल्याण राठोड, नरेश अंधारे, प्रमोद फोलाने, शिवाजी जाधव, तात्यासाहेब गोपालघरे, रामदास राख आदींनी घटनास्थळी धाव घेऊन राष्ट्रीय महामार्गावर नाकाबंदी केली.


सुनील सुरडकर यांच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत. हल्लेखोराच्या मारहाणीत सिद्धलिंग कोरे गंभीर जखमी झाले होते. माझ्या पायावरही चाकूने हल्ला झाला; परंतु त्याच्यावर लवकर उपचार व्हावे म्हणून जवळपास २० ते २५ कि.मी.चे अंतर २० मिनिटांत कापले आणि जालना रोडवरील एका रुग्णालयात गेलो. अर्ध्या अंतरापर्यंत कोरे हे शुद्धीवर होते.
रुग्णालय येईपर्यंत त्यांच्या जखमेतून रक्त वाहू नये, यासाठी बराच प्रयत्न केला. या रुग्णालयातील डॉक्टरांनी घाटी रुग्णालयात जाण्याचे सांगितले.
हल्लेखोराने माझ्याही पोटाच्या दिशेने चाकूचा वार केला; परंतु हा वार चुकविला. हा वार मांडीवर लागला. घटनेच्या वेळी मोबाईल कुठेतरी पडला. त्यामुळे मदतीसाठी कोणाची मदत घेण्याऐवजी रुग्णालयात गेल्याचे सुनील सुरडकर यांनी सांगितले.
मारहाण पाहूनही वाहने सुसाट
रात्रीची दहाची वेळ, रस्त्याने ये-जा करणाºया वाहनांची चांगली वर्दळ, त्यामुळे मदतीसाठी कोणीतरी धावून येईल, असे वाटले; परंतु मारहाण होताना पाहून वाहन थांबविण्याकडे दुर्लक्ष करून अनेक जण निघून गेले.
एका वाहनचालकाने धाडस दाखविले; परंतु हल्लेखोराने धमकाविल्यानंतर तोही मुकाट्याने निघून गेल्याचे जखमी चालक सुनील सुरडकर यांनी सांगितले.

Web Title: One killed by dacoits on Aurangabad-Beed highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.