दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यास एक महिना कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 07:03 PM2018-10-17T19:03:51+5:302018-10-17T19:07:03+5:30
मध्यरात्री दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या एका आरोपीस न्यायालयाने एक हजार रुपये दंड व एक महिना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
उमरी (नांदेड ) : मध्यरात्री दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या एका आरोपीस न्यायालयाने एक हजार रुपये दंड व एक महिना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, १४ सप्टेंबर २०१४ रोजी वाघाळा टी - पॉईंटवर पोलीस नायक विश्वंभर निकम, पथकप्रमुख एस. टी. झगडे, बी. डी. काकडे आदी कर्मचारी एसएसटी पथकामध्येकार्यरत होते. रात्री अकरा वाजताच्या सुमारास कारचालक बालाजी विठ्ठल कोल्हेवाड (एमएच २२- एच ४५५ ) याची गाडी पथकाने तपासणीसाठी अडवली. यावेळी बालाजीने जोरजोरात आरडाओरड करत तपासणीस विरोध केला.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याने मद्य प्राशन केल्याचे लक्षात आले. यानंतर बालाजीला न्यायालयात हजर करण्यात आले असता कलम ८५(१) मुंबई दारूबंदी कायद्याअंतर्गत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. डी. जाधव यांनी त्यास एक हजार रुपये दंड व एक महिना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अजीम खान यांनी काम पाहिले. त्यांना पोलीस नायक एस. एफ. राठोड यांनी सहकार्य केले.