एक पाऊल पुढे ! शेतक-यांची मुले देत आहेत सोशल मीडियातून आधुनिक शेतीचे धडे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2017 01:50 PM2017-12-11T13:50:09+5:302017-12-11T13:51:40+5:30
फेसबुक, व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडियामुळे माहितीची देवाणघेवाण वाढली आहे़ या माध्यमाचा शेती व शेतक-यांसाठी फायदा व्हावा आणि आधुनिक शेती, शेतीपुरक व्यवसाय, इतर राज्ये, देशातील शेतीसंदर्भातील माहिती मराठी शेतक-यांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न कृषी पदवीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी ‘कृषिसमर्पण’ या फेसबुक, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून करीत आहेत.
- श्रीनिवास भोसले
नांदेड : फेसबुक, व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडियामुळे माहितीची देवाणघेवाण वाढली आहे़ या माध्यमाचा शेती व शेतक-यांसाठी फायदा व्हावा आणि आधुनिक शेती, शेतीपुरक व्यवसाय, इतर राज्ये, देशातील शेतीसंदर्भातील माहिती मराठी शेतक-यांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न कृषी पदवीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी ‘कृषिसमर्पण’ या फेसबुक, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून करीत आहेत़
शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या कृषी पदवीधर, उच्चशिक्षित प्रगतशील व प्रयोगशील तरुणांनी संघटित होऊन कृषिजनसेवेसाठी पुढाकार घेतला आहे़ केवळ शेतीच नाही तर जगातील सगळीच क्षेत्रे नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून सुधारली आहेत़ शेतीत तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला पाहिजे, असे आवाहन कृषिसमर्पण टीम करीत आहे़ आधुनिक, शेतीपूरक व्यवसाय अथवा कृषीसंदर्भात इतर विषयांवर शक्य असेल ती सर्व मदत शेतक-यांना वेळेत मिळत असल्याने हा समूह शेतक-यांच्या जिव्हाळ्याचा बनत आहे.
हंगामनिहाय पीक लागवड, लागवड पद्धती, बेण्याची निवड, आंतरपीक, रोगनियंत्रणासाठी उपाय, अवजारांचा वापर, पाणी, शेणखत, खत आदींचा परिस्थितीनुसार कसा वापर करावा आदीसंदर्भात माहिती दिली जाते़ शेती व्यवसायात ‘काय पिकतंय यापेक्षा बाजारामध्ये काय विकतंय’ याला खूप महत्त्व असल्याने यापुढे शेतमालाचा व्यापार, अन्नप्रक्रिया, शेतीपूरक जोडधंदे, परदेशी भाजीपाला-फळबाग लागवड, शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञानावर भर देताना सोशल मीडियामधील साधनांचा प्रभावी वापर या तरूणांकडून सुरू आहे़
नांदेड, हिंगोलीच्या युवकांचा सहभाग
अहमदनगर जिल्ह्यातील विळद घाट येथील प्रा. डॉ. विनायक शिंदे-पाटील यांनी जवळपास तीन वर्षांपूर्वी या ग्रूपची स्थापना केली़ त्यांच्यासमवेत कृषीचे शिक्षण घेणारे श्रीनिवास खंदारे-पाटील वसमत, हिंगोली, सागर वाघ-नाशिक, पुरुषोत्तम परळकर -बीड, स्वप्निल सावरकर - अमरावती, दिनेश माळी -नंदुरबार, चैतन्य जोशी-सोलापूर, योगेश गोळे - पुणे, कल्पेश पाटील -जळगाव, भूषण महाकाळ - बुलढाणा आणि उच्चशिक्षित व प्रयोगशील शेतकरी नौशाद खान - नांदेड, संदीप राठोड, औरंगाबाद, धनंजय येलगट्टे, लातूर, बालचंद घुनावत हे सदस्य तर डॉ. सारिका वांद्रे या महिला विभागाच्या प्रबंधक म्हणून काम पाहत आहेत.
चाळीस हजारांवर सदस्य
दिवसेंदिवस सोशल मीडियाचा वापर वाढत आहे. यात शेतकरीही मागे राहिला नाही, परंतु याचा योग्य उपयोग करीत कृषीसमर्पण टीमने शेतक-यांना माहितींचा खजिना उपलब्ध करून दिला आहे. राज्यभरात ४० हजारांहून अधिक सदस्य असून यासाठी कुठलेही शुल्क आकारले जात नाही़
- श्रीनिवास खंदारे पाटील, सदस्य