कोरोनामुक्त एक हजार ४५० शाळा होणार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:13 AM2021-07-09T04:13:17+5:302021-07-09T04:13:17+5:30
गावपातळीवर समिती कोविडमुक्त गावातील ग्रामपंचायतीने त्यांच्या अखत्यारित असणाऱ्या गावातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याबाबत पालकांशी चर्चा करून ...
गावपातळीवर समिती
कोविडमुक्त गावातील ग्रामपंचायतीने त्यांच्या अखत्यारित असणाऱ्या गावातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याबाबत पालकांशी चर्चा करून ठराव करावा. ग्रामपंचायत स्तरावर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली यासाठी समिती गठीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या समितीने शाळा सुरू करण्याआधी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शिक्षकांचे लसीकरण करण्याबाबत पाठपुरावा करावा तसेच विद्यार्थी कोरोनाग्रस्त आढळल्यास तत्काळ शाळा बंद करून निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही करावी, तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने वैद्यकीय उपचार करावेत, अशा सूचना दिल्या आहेत.
चौकट
--------------
शाळांसाठी मार्गदर्शक सूचना
शाळेमधील वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, डेस्क, टेबल, खुर्च्या, वाहने यांची वारंवार स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्याची जबाबदारी शाळा प्रशासनाची असेल.
संबंधित शाळेतील शिक्षकांनी गावातच राहावे किंवा येण्या-जाण्यासाठी स्वत:च्या वाहनाचा वापर करावा.
रोज दोन सत्रांमध्ये भरणाऱ्या शाळेचे आणि त्यातील वर्गाचे स्वतंत्र आगमन आणि गमन यांचे वेळापत्रक व मार्ग शाळांनी निश्चित करावेत, म्हणजे गर्दी टळेल.
ही काळजी घ्यावी...
एका बाकावर एक विद्यार्थी
दोन बाकांमध्ये सहा फुटांचे अंतर
एका वर्गात जास्तीत जास्त १५ ते २० विद्यार्थी
सत्रांच्या वेळा व महत्वाच्या विषयांचे आलटून पालटून नियोजन करणे
सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आटीपीसीआर, रॅपिड ॲटिजन चाचणी अनिवार्य
विद्यार्थ्यांची उपस्थिती ऐच्छिक असून ती पूर्णत: पालकांच्या संमतीवर अवलंबून असेल.
जिल्ह्यातील एकूण गावे - १ हजार ६०४
कोरोनामुक्त गावे - १ हजार ४५०
जिल्ह्यातील एकूण माध्यमिक शाळा - ८०१
जिल्हा परिषदेच्या शाळा - ७०
अनुदानित शाळा - ६१७
विनाअनुदानित शाळा - १८४