मानार प्रकल्पात केवळ ११ % साठा; बिलोली, धर्माबाद, नायगाव तालुक्याचा पाणीप्रश्न गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 07:44 PM2018-03-15T19:44:47+5:302018-03-15T19:45:42+5:30
बारूळ मानार प्रकल्पाची १४६ दलघमी क्षमता असून या प्रकल्पात सध्या ११ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे़
नांदेड : बारूळ येथील चार तालुक्यांसाठी कामधेनू असलेल्या मानार प्रकल्पात ११ टक्के पाणीसाठा असल्यामुळे बिलोली, धर्माबाद, नायगाव या तीन तालुक्यांचा पाणीप्रश्न गंभीर झाला आहे़
बारूळ मानार प्रकल्पाची १४६ दलघमी क्षमता असून या प्रकल्पात सध्या ११ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे़ या प्रकल्पावरच चार तालुक्यांची तहान भागते़ त्यात कंधार, नायगाव, बिलोली, धर्माबाद या तालुक्यांचा समावेश आहे़ उपलब्ध असलेले ११ टक्के आरक्षित पाण्यात १ घनमीटर नायगावसाठी शिल्लक असून जि़ प़ विभाग पाणीपुरवठा ग्रामीण भागासाठी ५ घनमीटर ठेवण्यात आला आहे़ जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार उन्हाळ्यात पाणी देण्यात येईल, अशी माहिती मानार उपविभागीय अधिकारी बारूळचे एऩएमक़ुरेकर यांनी दिली़
मानार प्रकल्पावर २४ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली आहे़ मात्र प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा असल्यामुळे ही शेती आता कोरडवाहू झाली आहे़ पावसाळा चार महिन्यांवर असून अत्यल्प साठ्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे़ उपलब्ध असलेल्या ११ टक्के पाणीसाठ्याची बाष्पीभवनामुळे पातळी कमी होणार आहे़ या प्रकल्पावर २०० भोई समाज कुटुंबांचा उदरनिर्वाह होतो़ त्यात धर्मापुरी, बारूळ, कौठा, चिंचोली, बाचोटी, तेलूर, बहाद्दरपुरा आदी ठिकाणी या समाजाचे कुटुंब असून पाणीसाठा कमी झाल्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न समोर आला आहे़
या प्रकल्पात डावा कालवा व उजवा कालवा असे दोन कालवे आहेत़ शासनाच्या आदेशानुसार उन्हाळी आरक्षित पाण्याची पाळी या कालव्यातून सोडली जाणार आहे़ त्यामुळे प्रकल्पात नायगाव व जि़प़ पाणीपुरवठा विभागाचे आरक्षित पाणी सोडून उर्वरित पाण्यावर चार महिने काढावे लागणार आहे़ त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे़
आदेशानंतर पाणी देण्यात येईल
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आरक्षित नायगाव व जि़प़ पाणीपुरवठा विभाग यांना मानार प्रकल्पातील पाणी देण्यात येईल
- एऩएमक़ुरेकर, उपविभागीय अधिकारी, बारूळ
जमीन कोरडवाहू बनली
प्रकल्पात साठा कमी असल्यामुळे १२ महिने ओलित राहणारी जमीन आज कोरडवाहू बनली आहे - मोहन नाईक, शेतकरी़
मत्स्य व्यवसायावर परिणाम
प्रकल्पात पाणी कमी असल्याने मत्स्य व्यवसायावर परिणाम झाला आहे. - नारायण टोकलवाड