जिल्ह्यात केवळ २८ टक्के जलसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 12:34 AM2019-01-14T00:34:34+5:302019-01-14T00:35:05+5:30
जिल्ह्यात आजघडीला केवळ २८ टक्के जलसाठा शिल्लक असून याच जलसाठ्यावर जून-जुलैपर्यंत पाणीप्रश्न सोडवावा लागणार आहे.
अनुराग पोवळे।
नांदेड : जिल्ह्यात आजघडीला केवळ २८ टक्के जलसाठा शिल्लक असून याच जलसाठ्यावर जून-जुलैपर्यंत पाणीप्रश्न सोडवावा लागणार आहे. पाणीप्रश्न सोडवताना प्रशासनाची मोठी कसरत होणार असून नागरिकांनाही आतापासूनच पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
जिल्ह्यात १०७ प्रकल्प असून २ मोठे प्रकल्प आहेत, ९ मध्यम प्रकल्प, ४ उच्चपातळी बंधारे, ८८ लघु प्रकल्प आणि ४ कोल्हापुरी बंधारे आहेत. या प्रकल्पातील सर्वाधिक जलसाठा हा विष्णूपुरी प्रकल्पात आहे. आजघडीला विष्णूपुरीत ५२.२० टक्के तर दुसरा मोठा प्रकल्प असलेल्या मानार प्रकल्पात २९.६९ टक्के जलसाठा आहे. मानार प्रकल्पात ४१.०३ दलघमी तर विष्णूपुरी प्रकल्पात ४२.१७ दलघमी पाणीसाठा आहे.
जिल्ह्यात असलेल्या ९ मध्यम प्रकल्पाची स्थितीही जेमतेमच आहे. या प्रकल्पामध्ये ३१.३६ दलघमी साठा आहे. या पाण्याची टक्केवारी २२.५५ इतके आहे. जिल्ह्यात ४ उच्च पातळीचे बंधारे असून आजघडीला त्या बंधाऱ्यात २०.२५ टक्के म्हणजेच ३७.०६ दलघमी जलसाठा आहे. लघुप्रकल्पात २९.६८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. ८१.२२ दलघमी क्षमतेच्या ८८ लघुप्रकल्पात ५७.३७ दलघमी पाणी शिल्लक आहे.
नांदेड पाटबंधारे मंडळात असलेल्या १४६ प्रकल्पांची परिस्थिती पाहिली असता पाटबंधारे मंडळात केवळ २५.२७ टक्के जलसाठा आहे. हिंगोली जिल्ह्यातील ३० प्रकल्पात केवळ ४.५७ टक्के जलसाठा असून ४३.२७ दलघमी पाणी उपलब्ध आहे. त्यामध्ये यलदरी प्रकल्पात २१.३१ दलघमी म्हणजेच केवळ २ टक्के तर सिद्धेश्वर प्रकल्पात ६.५४ दलघमी अर्थात ८.०८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. विष्णूपुरीतील पाणी संपल्यानंतर पर्याय म्हणून यलदरी आणि सिद्धेश्वर प्रकल्पाकडे मागील काही वर्षांपासून पाहिले जात होते. आता हे प्रकल्पही कोरडे पडले आहे. इसापूर प्रकल्पात उपयुक्त जलसाठा ४२२.६६ दलघमी आहे.
ही बाब नांदेडसाठीही समाधानकारक आहे. निम्म्या नांदेड जिल्ह्याला इसापूर प्रकल्पातून पाणी उपलब्ध होते. गतवर्षी हा प्रकल्प कोरडा पडल्याने जिल्ह्यात सिंचनाला पाणी मिळाले नव्हते. यावर्षी इसापूर प्रकल्प क्षेत्रातील सिंचनाचा प्रश्न सुटला आहे. त्याचवेळी पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सदरील भागांना भेडसावणार नाही, ही बाब स्पष्ट आहे. परभणी जिल्ह्यातील ८ प्रकल्पात १४ टक्के जलसाठा शिल्लक असून केवळ ६ दलघमी पाणी येथे उपलब्ध आहे. एकूणच जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नांदेड, लोहा, कंधार, नायगाव यासह अन्य तालुक्यांनाही भेडसावणार आहे.
कोल्हापुरी बंधारे कोरडेठाक
जिल्ह्यात असलेल्या चार कोल्हापुरी बंधाऱ्यात एक थेंबही पाणी शिल्लक नाही. जानेवारीमध्येच ही अवस्था आहे. पावसाळ्यानंतर किमान चार महिने तरी या बंधाऱ्यात पाणी शिल्लक रहावे, अशी अपेक्षा असते. मात्र प्रत्यक्षात बंधाऱ्याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने या बंधाऱ्याचा एक टक्काही उपयोग होत नाही. बंधाऱ्याचे दरवाजेच नसल्याने पाणी अडणार कसे? कोल्हापुरी बंधाऱ्याना दरवाजे नसल्याने या बंधाऱ्याचा मूळ उद्देशच साध्य होत नाही. पाण्याचे वाढते दुर्भिक्ष लक्षात घेता वाया जाणा-या एका-एका थेंबाला अडविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.