नांदेड जिल्ह्यात उरला केवळ ४८ टक्के साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 11:52 PM2018-11-12T23:52:07+5:302018-11-12T23:54:57+5:30
नोव्हेंबरमध्ये १५ तारखेपासून पहिली पाणीपाळी दिली जाणार आहे. या पाणीपाळीमुळे जवळपास १० ते १५ दलघमी पाणी कमी होणार असून शिल्लक पाणीसाठा हा डिसेंबरपर्यंतच पुरणार आहे. त्यामुळे नांदेडवर डिसेंबरमध्येच जलसंकट ओढवण्याची भीती निर्माण झाली आहे.
अनुराग पोवळे ।
नांदेड : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णूपुरी प्रकल्पातून रबी हंगामाच्या सिंचनासाठी पाणीपाळ्या देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नोव्हेंबरमध्ये १५ तारखेपासून पहिली पाणीपाळी दिली जाणार आहे. या पाणीपाळीमुळे जवळपास १० ते १५ दलघमी पाणी कमी होणार असून शिल्लक पाणीसाठा हा डिसेंबरपर्यंतच पुरणार आहे. त्यामुळे नांदेडवर डिसेंबरमध्येच जलसंकट ओढवण्याची भीती निर्माण झाली आहे.
मंत्रालयात १६ आॅक्टोबर रोजी झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत शंकरराव चव्हाण विष्णूपुरी प्रकल्पातील पाणी रबी हंगामासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून हे पाणी देण्याचा निर्णय नांदेड पाटबंधारे विभागाने घेतला आहे. १५ ते ३० नोव्हेंबरदरम्यान हे पाणी दिले जाणार आहे. विष्णूपुरी जलाशयातील उपलब्ध राहणा-या जलसाठ्याचा आढावा घेवून पाणी शिल्लक राहत असल्यास दुसरी पाणीपाळी देण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे. त्याचवेळी पिकांचे नियोजन दुसरी पाणीपाळी अनिश्चित असल्याची बाब विचारात घेवून करावे, असे स्पष्ट केले आहे. पाटबंधारे विभागाची ही पाणी पाळी देण्याची सुरू असताना महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग मात्र चिंताक्रांत झाला आहे. नांदेड शहरासाठी एकूण ३० दलघमी जलसाठा विष्णूपुरी प्रकल्पात राखीव ठेवण्यात आला आहे. शहराला प्रतिदिन ९० दशलक्ष लिटर पाणी लागते तर महिन्यासाठी २.७० दलघमी पाणी आवश्यक आहे. वर्षाकाठी नांदेड शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी ३४.४० दलघमी पाणी आवश्यक आहे.
विष्णूपुरी प्रकल्पातून आजघडीला गोदावरीच्या दोन्ही किनाºयावरुन होणारा शेतीसाठीचा पाणीउपसा, ग्रामीण पाणी पुरवठ्यासाठी होणारा पाणीउपसा, एमआयडीसीसाठी होणारा पाणी उपसा आणि दररोज होणारा पाणी उपसा लक्षात घेता एका महिन्यामध्ये विष्णूपुरी प्रकल्पातून २३.१० दलघमी पाणी कमी होत आहे.
पिण्याच्या पाण्याचेही सुरू झाले राजकारण
यंदा प्रथमच विष्णूपुरीतून नांदेड शहराला होणा-या पाणीपुरवठ्यावर राजकारणाचे ढग घोंगावत आहेत. विष्णूपुरीचे पाणी हे शेतीसाठीच ठेवावे आणि इसापूर प्रकल्पातून नांदेड शहराला पाणीपुरवठा करावा, अशी मागणी शिवसेनेच्या आमदारांनी केली आहे. प्रत्यक्षात राज्यभरात प्रकल्पातील पाण्याचे आरक्षण करताना पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले जाते. शिल्लक पाणी हे सिंचनासाठी द्यावे, असे धोरण आहे. मात्र या धोरणाला जिल्ह्यातील सत्तेत सहभागी असलेल्या राजकारण्यांनी छेद दिला आहे. प्रकल्पातून अवैधरित्या होणारा पाणीउपसा रोखण्यासही राजकीय दबाव आणला जात आहे.
विष्णूपुरी प्रकल्पातील आॅक्टोबर अखेरच्या ६०.५७ दलघमी पाणीसाठा आणि उपशाचे प्रमाण लक्षात घेता १५ जानेवारी २०१९ पर्यंतच हे पाणी संपणार आहे. त्यातच आता शेतीसाठी पहिली पाणीपाळी १५ नोव्हेंबरपासून दिली जाणार आहे. त्यामुळे १० ते १५ दलघमी पाणी कमी होणार आहे. त्यामुळे डिसेंबरमध्येच प्रकल्पातील जलसाठा तळाशी जाणार आहे. एकूणच नांदेड शहरावर जलसंकट डिसेंबरमध्येच येणार आहे. त्यामुळे पर्यायी जलसाठा उपलब्ध करायचा कोठून? हा प्रश्न उद्भवला आहे.
इसापूर प्रकल्पातून नांदेड शहरातील १५ दलघमी पाणीसाठा राखीव ठेवण्यात आला आहे. शहराला दररोज ९० दशलक्ष लिटर पाणीसाठा आवश्यक आहे. इसापूर प्रकल्पातून आसना नदीवरील पाणी घ्यावे लागते. या बंधाºयाची क्षमताही ०.९५ दलघमी इतकी आहे. या बंधाºयातून दोन पंपाद्वारे प्रतिदिन ११ लाख लिटर पाणी प्रतितास उपसले जाते.
हे २२ दशलक्ष लिटर पाणी शहरातील २ लाख लोकसंख्येला पुरेल. बंधा-यातून होणा-या दररोजच्या उपशामुळे दहा दिवसांतच बंधा-याचे पाणी संपणार आहे. त्यामुळे इसापूर प्रकल्पावर आधारित पर्यायी पाणीपुरवठा योजनाही नांदेडकरांची तहान भागवू शकणार नाही.
प्रत्यक्षात विष्णूपुरी आणि इसापूर प्रकल्पातून येणा-या पाण्याची ही वस्तुस्थिती आहे. तर दुसरीकडे पर्यायी पाणी पुरवठा अवलंबून असलेल्या इसापूर प्रकल्पाच्या वरिल भागातच पाणी अडविले जात असल्याने इसापूरचा साठाही कमी झाला आहे. त्यामुळे विष्णूपुरीतील पाणी संपल्यानंतर पाणी पुरवठा करायचा कोठून? हा प्रश्न महापालिकेसह जिल्हापरिषदेसमोर उभा राहिला आहे.
महापालिकेने इसापूर प्रकल्पात पाण्यासाठीचे आरक्षण वाढविले तरी सांगवी येथील पंपांची उपसा करण्याची क्षमता केवळ २२ दशलक्ष लिटर इतकी आहे तर विष्णूपुरीतून पाणी उपसा करण्यासाठी क्षमता ७० दशलक्ष लिटर इतकी आहे. त्यामुळे सांगवी पंपातून होणाºया २२ दशलक्ष पाण्यातून संपूर्ण नांदेडची भहान भागविणार कशी? हा प्रश्न पुढे आला आहे.
नांदेडवर डिसेंबर महिन्यातच जलसंकट
जिल्ह्यात आजघडीला केवळ ४८.३ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. परतीचा पाऊस यंदा झालाच नसल्याने पाणीसाठ्यात वाढ झाली नाही. आजघडीला मानार प्रकल्पात ५१.४५ दलघमी, विष्णूपुरीत ५४.५५ दलघमी म्हणजेच ६७.५२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यात असलेल्या ९ मध्यम प्रकल्पात ५६.६२ दलघमी जलसाठा आहे. चार उच्च पातळीच्या बंधाºयात ४४.८३ टक्के म्हणजेच ८२.०६ टक्के जलसाठा आहे. ८८ लघु प्रकल्पामध्येही १०९.२७ दलघमी साठा आहे. कोल्हापुरी बंधाºयातही २.२७ दलघमी जलसाठा असून ३३.२१ टक्केवारी आहे. नांदेड पाटबंधारे मंडळातील १४६ प्रकल्पामध्ये १ हजार ९९ दलघमी जलसाठा उरला आहे. नांदेड पाटबंधारे मंडळात नांदेडसह, परभणी, हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यातील प्रकल्प आहेत.