बंधाऱ्यात निम्माच साठा; नांदेडसह परभणी, हिंगोली जिल्ह्यांवर पाणीसंकट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 03:51 PM2023-10-17T15:51:00+5:302023-10-17T15:58:01+5:30

नदीकाठच्या गावांमधील पाण्याचे संकट कमी व्हावे, शेतीचे सिंचन वाढावे, या उद्देशाने गोदावरी नदीवर ठिकठिकाणी बंधारे बांधण्यात आले.

Only half the stock in the dam; Water crisis over Parbhani, Hingoli districts along with Nanded | बंधाऱ्यात निम्माच साठा; नांदेडसह परभणी, हिंगोली जिल्ह्यांवर पाणीसंकट

बंधाऱ्यात निम्माच साठा; नांदेडसह परभणी, हिंगोली जिल्ह्यांवर पाणीसंकट

नांदेड : गोदावरी आणि पैनगंगा नद्यांवर बांधलेल्या बंधाऱ्यांत सरासरी निम्माच पाणीसाठा झाला असून, नांदेडसह परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक गावांवर पाणीसंकट ओढवण्याची भीती निर्माण झाली आहे.

नदीकाठच्या गावांमधील पाण्याचे संकट कमी व्हावे, शेतीचे सिंचन वाढावे, या उद्देशाने गोदावरी नदीवर पैठणपासून ते नांदेड जिल्ह्यापर्यंत ठिकठिकाणी बंधारे बांधण्यात आले. यावर्षी पाऊसकाळ कमी राहिला. काही जिल्ह्यांमध्ये सरासरीएवढाही पाऊस झाला नाही. प्रकल्प रिकामे असून, नदीतून पुढे पाणी सोडण्याची वेळ आलीच नाही. परभणी जिल्ह्यात गोदावरी नदीवर पाच बंधारे असून, नांदेड जिल्ह्यात चार बंधारे आहेत. तर नांदेड जिल्ह्यातील पैनगंगा नदीवर पाच बंधारे आहेत.

सध्या गोदावरी नदीवरील परभणी जिल्ह्यातील बंधाऱ्यांमध्ये जेमतेम निम्मा पाणीसाठा आहे. तर नांदेड जिल्ह्यात गोदावरीवरील बंधाऱ्यांत बऱ्यापैकी साठा आहे. मात्र, पैनगंगा नदीवरील बंधारे चक्क कोरडेच आहेत. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाईची चिंता आतापासूनच सतावत आहे. जायकवाडी प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडले तरच बंधाऱ्यात पाणीसाठा होणार आहे. उन्हाळ्यातील टंचाई दूर करण्यासाठी पुन्हा जायकवाडी प्रकल्पावर अवलंबून राहावे लागेल.

प्रकल्पांतील साठाही चिंतेचा
परभणी जिल्ह्यातील येलदरी प्रकल्पात ६२ टक्के, सिद्धेश्वर प्रकल्पात ९९ टक्के, निम्न दुधना प्रकल्पात २७ टक्के, अपर मानार प्रकल्पात ३५ टक्के, निम्न मानार प्रकल्पात ७३ टक्के, इसापूर प्रकल्पात ८३ टक्के, तर नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा आहे. परभणी जिल्ह्यातील निम्न दुधना आणि नांदेड जिल्ह्यातील अपर मानार प्रकल्पातील साठा चिंता वाढवीत आहे.

बंधाऱ्यातील साठा

ढालेगाव : ४८ टक्के

तारुगव्हाण : ५० टक्के

मुदगल : ४९ टक्के

मुळी : ० टक्के

डिग्रस : ७३ टक्के

अंतेश्वर : १०० टक्के

आमदुरा : ८० टक्के

बळेगाव : ८७ टक्के

बाभळी : शून्य टक्के

पैनगंगा नदीवरील बंधारे
मंगरूळ : ०.४७ टक्के
भंडारवाडी : ६.५० टक्के
मोहपूर :०.३५ टक्के
साकूर : ०.३५ टक्के
दिगडी : १.७२ टक्के

Web Title: Only half the stock in the dam; Water crisis over Parbhani, Hingoli districts along with Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.