नांदेड येथील राज्यातील एकमेव औषधी वनस्पती उद्यानच दुर्लक्षामुळे पडले आजारी ; दुर्लभ वनस्पती मातीमोल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2017 04:18 PM2017-12-26T16:18:28+5:302017-12-26T16:33:50+5:30

राज्यात एकमेव असलेल्या शासकीय आयुर्वेद आणि युनानी रसशाळेला कच्चा माल पुरविणार्‍या ४० हेक्टरवरील औषधी वनस्पती उद्यानालाच सध्या उपचाराची गरज आहे़

the only herbal garden in the state is in poor condition at Nanded | नांदेड येथील राज्यातील एकमेव औषधी वनस्पती उद्यानच दुर्लक्षामुळे पडले आजारी ; दुर्लभ वनस्पती मातीमोल

नांदेड येथील राज्यातील एकमेव औषधी वनस्पती उद्यानच दुर्लक्षामुळे पडले आजारी ; दुर्लभ वनस्पती मातीमोल

googlenewsNext
ठळक मुद्देनिजामकाळापासून ही रसशाळा अस्तित्वात असून देशभरात एकेकाळी तिचा दबदबा होता़ या रसशाळेतून देशभरात औषधींचा पुरवठा केला जात होता़ शासनाच्या उदासीन धोरणामुळे गेल्या पाच वर्षांपासून रसशाळेसाठी कच्चा माल खरेदी करण्याचे दरपत्रकच निश्चित करण्यात आले नाही़त्यामुळे रसशाळेतील औषधी उत्पादन ठप्प झाले़ तयार केलेल्या जवळपास ४० लाखांच्या औषधी अनेक वर्षांपासून धूळखात आहेत़ 

- शिवराज बिचेवार
नांदेड : राज्यात एकमेव असलेल्या शासकीय आयुर्वेद आणि युनानी रसशाळेला कच्चा माल पुरविणार्‍या ४० हेक्टरवरील औषधी वनस्पती उद्यानालाच सध्या उपचाराची गरज आहे़ बारड परिसरात असलेल्या या उद्यानातील दोन बोअर आटले असून या ठिकाणी असलेल्या वेगवेगळ्या १९८ जातींच्या कोट्यवधी रुपयांच्या औषधी वनस्पती मातीमोल होत आहेत़ 

नांदेडला असलेल्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयात असलेली आयुर्वेद व युनानी रसशाळेला मोठा इतिहास आहे़ निजामकाळापासून ही रसशाळा अस्तित्वात असून देशभरात एकेकाळी तिचा दबदबा होता़ या रसशाळेतून देशभरात औषधींचा पुरवठा केला जात होता़ परंतु शासनाच्या उदासीन धोरणामुळे गेल्या पाच वर्षांपासून रसशाळेसाठी कच्चा माल खरेदी करण्याचे दरपत्रकच निश्चित करण्यात आले नाही़ त्यामुळे रसशाळेतील औषधी उत्पादन ठप्प झाले़ तयार केलेल्या जवळपास ४० लाखांच्या औषधी अनेक वर्षांपासून धूळखात आहेत़ 

रसशाळेतील ११० कर्मचार्‍यांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांना इतर विभागात वर्ग करण्यात आले़ रसशाळेच्या भरभराटीच्या काळात औषधी वनस्पतींचा पुरवठा करण्यासाठी बारड परिसरात ४० हेक्टर जमीन घेण्यात आली होती़ या ठिकाणी १९८ प्रकारच्या विविध औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतींची लागवड करण्यात आली़ त्याच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी या ठिकाणी पाच कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली़ 

पाण्यासाठी दोन बोअर घेण्यात आले होते़ त्याचबरोबर औषधी वनस्पती साठविण्यासाठी मोठे गोदामही बांधण्यात आले होते़ रसशाळा सुरु असताना या औषधी वनस्पती उद्यानालाही अच्छे दिन होते़ परंतु आता पाच वर्षांपासून रसशाळाच बंद पडल्यामुळे वनस्पती उद्यानही दुर्लक्षित झाले आहे़ या ठिकाणचे दोन्ही बोअर आटले आहेत़ गोदाम मोडकळीस आले आहे़ त्याचबरोबर उद्यानातील लाखमोलाच्या औषधी वनस्पतीवर भुरट्यांकडूनच डल्ला मारण्याचे काम सुरु आहे. वाट्टेल तो आपल्या सोयीप्रमाणे या औषधी वनस्पती उद्यानाची लूट करीत आहे़ या भुरट्यांच्या नजरेतून अनेक दुर्लभ औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतीही सुटल्या नाहीत़ त्यामुळे ४० हेक्टरवरील हे औषधी वनस्पती उद्यान चोरट्यांसाठी कुरणच बनले आहे़ एकीकडे शासनाकडून आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसारासाठी हजारो कोट्यवधी रुपये खर्च करीत असताना दुसरीकडे आहे त्या दुर्लभ औषधी वनस्पती उद्यानाकडे मात्र दुर्लक्ष करीत आहे़ 

रसशाळेवर उद्यानाची संपूर्ण भिस्त
रसशाळेकडे शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून या रसशाळेत औषधी निर्मिती ठप्प आहे़ शासनाने रसशाळेला कच्चा माल खरेदीचे दरपत्रक निश्चित करुन द्यावे़ त्याचबरोबर राज्यातील शासकीय रुग्णालयांना रसशाळेतून औषधी खरेदी करण्याचा हट्ट धरल्यास रसशाळेला पूर्वर्वैभव प्राप्त होईल़ तसेच त्या माध्यमातून अनमोल अशा औषधी वनस्पती उद्यानालाही त्यामुळे चांगले दिवस येतील़ 

पाच कर्मचार्‍यांची उद्यानासाठी नियुक्ती
बारड परिसरात असलेल्या या औषधी वनस्पती उद्यानासाठी पाच कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे़ दररोज हे कर्मचारी या ठिकाणी येतात़, परंतु या कर्मचार्‍यांसाठी या ठिकाणी कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध नाहीत़ कच्चा माल ठेवण्यासाठी असलेले गोदाम ओस पडले आहे़ यामध्ये असलेल्या साहित्याची मोडतोड झाली़ 

रसशाळा बंद पडल्याने वनस्पती उद्यानही दुर्लक्षित
रसशाळेच्या भरभराटीच्या काळात या उद्यानालाही विशेष महत्त्व प्राप्त झाले होते़ या ठिकाणच्या औषधी वनस्पतीद्वारे तयार केलेल्या औषधांना देशभरातून मागणी होती़ आता रसशाळाच बंद पडल्यामुळे उद्यानालाही कुणी वाली उरला नाही़ पाणीही नसल्यामुळे आहे त्या वनस्पती टिकविण्यासाठी या ठिकाणी असलेल्या कर्मचार्‍यांना केविलवाणा प्रयत्न करावा लागत आहे़ 

पाणीपुरवठ्याची सोयच नाही
या ठिकाणी औषधी वनस्पतींना पाणी देण्यासाठी वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत़ वनस्पतीभोवती पाणी अडविण्यासाठी आळेही तयार आहेत़ त्याचबरोबर दोन बोअरही घेण्यात आले होते़ परंतु सहा महिन्यापूर्वीच हे दोन्ही बोअर आटले आहेत़ वनस्पतींना पाण्याची पर्यायी व्यवस्थाही करण्यात आली नाही़ त्यामुळे अनेक वनस्पती वाळल्या आहेत़  तर ज्या आहेत त्याही मरणासन्न आहेत़

औषधी वनस्पतींची भुरट्यांकडून होतेय लूट
या उद्यानात कुडा, अर्जुन, बेहडा, हिरडा, दंती, शिवन,टेंटू, डिंकमाली, करंज, शिरिष, पालाश, कुमारी, निंबुल, जपा, अजमोक्ष, खदीर, सर्पगंधा, वासनवेल, अर्क,  अडूळसा, पुनरवन, रान एरंड, गोखरु, सफेद मुसळी यासारख्या औषधी गुणधर्म असलेल्या तब्बल १९८ जातींच्या वनस्पतींचा या उद्यानात भांडार आहे़ यातील अनेक औषधी वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत़
 

Web Title: the only herbal garden in the state is in poor condition at Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nandedनांदेड