नांदेडात एटीएसच्या कारवाईत साडेसात लाखांचा अफू जप्त; राजस्थानमधील युवक-युवती ताब्यात
By श्रीनिवास भोसले | Published: December 21, 2023 06:51 PM2023-12-21T18:51:28+5:302023-12-21T18:51:44+5:30
कोणत्या न कोणत्या कारवाईमुळे नांदेड नेहमीच राज्यातच नव्हे तर देशाच चर्चेत राहते.
नांदेड: दहशतवाद विरोधी पथकाने गुरूवारी दुपारी नांदेड रेल्वेस्थानकासमोर धाड टाकून जवळपास साडेसात लाख रूपयांचा अफू जप्त केला. एका युवकासह तरूणीला ताब्यात घेतले असून त्यांना उद्या शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. या कारवाईमुळे नांदेडात नशेसाठी वापरले जाणारे आम्लीपदार्थ परराज्यातून येत असल्याचे पुन्हा उघड झाले आहे.
कोणत्या न कोणत्या कारवाईमुळे नांदेड नेहमीच राज्यातच नव्हे तर देशाच चर्चेत राहते. दरम्यान, मागील काही दिवसांपासून गांजासह इतर अंमली पदार्थाची नांदेडात विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यातही परराज्यातून येणारा अफू, गांजा रोखण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू होते. राजस्थानातील दोघे जण नांदेडात अफू घेवून आल्याची माहिती एटीएसच्या पथकाला मिळाली होती. त्यानूसार गुरूवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास दहशतवाद विरोधी पथकाने वजिराबाद ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने एटीएसचे पोलीस निरीक्षक सुनील नाईक यांच्या नेतृत्वाखाली धाड टाकण्यात आली.
नांदेड रेल्वेस्थानकातून बाहेर पडणाऱ्या एका युवकासह तरूणीला ताब्यात घेतले. यामध्ये युवकाचे नाव सुरेशकुमार किशनाराम बिष्णोई (वय २९)रा.अरणीयाली.ता. रानेवाडा जि.जालोर तर युवतीचे नाव अमरी नारायण अड (वय २६) रा.बस्सी ता.कुशलगड जि.बासवाडा असे आहे. दोघेही राजस्थानमधील आहेत. त्यांच्याकडून जवळपास ७ लाख ३२ हजार रूपये किंमतीचा ३ किलो ६६० ग्रॅम अफू न आंमली पदार्थ अफू/अफीम जप्त केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब थोरे यांच्या फिर्यादीवरून वजिराबाद ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई एटीएसचे पोलिस निरीक्षक सुनील नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक बाबासाहेब थोरे, अनिता चव्हाण, वजिराबादचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजू मुत्तेपोड, पोलीस उपनिरीक्षक अगबर पठाण, हेकॉ शेख चांद, संभाजी चाटे, मारोती कोटगीर, जयराम यळदगावे, दिनेश पांडे, वैजनाथ अनंतवार, बालाजी सोनटक्के, मोहम्मद अलीम, श्याम राऊत, गव्हाणकर, बसंत रामगडीया यांच्या पथकाने केली.
पोलिसांना गुंगारा देण्याचा डाव...
राजस्थानातून आणलेला अफू पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून आरोपींनी डाव रचला होता. परंतु, पोलिसांनी तो हाणून पाडला. महिला आरोपी असलेल्या अमरीकडे ३ किलो आणि पुरूरष आरोपीने स्वतकडे केवळ ६६० ग्रॅम अफू ठेवला. पोलिसांनी धाड टाकल्यानंतर त्यांनी एवढचा अफू असल्याचे सांगितले. परंतु, संशयितरित्या पळ काढण्याचा प्रयत्नात असलेल्या अमरीला पोलिसांनी पकडून चौकशी केली असता तिच्याकडे तब्बल तीन किलो अफू आढळला.