नियतीने हुकलेली संधी दुसऱ्या प्रयत्नात मिळवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 12:48 AM2019-03-17T00:48:24+5:302019-03-17T00:49:50+5:30
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत बिलोली तालुक्यातील बेळकोणी (बु.) येथील सामान्य कुटुंबातील लक्ष्मी प्रल्हाद डाकेवाड हिने ओबीसी महिला प्रवर्गातून राज्यात दुसरा क्रमांक मिळवून घवघवीत यश मिळविले़
गौतम लंके।
कासराळी : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत बिलोली तालुक्यातील बेळकोणी (बु.) येथील सामान्य कुटुंबातील लक्ष्मी प्रल्हाद डाकेवाड हिने ओबीसी महिला प्रवर्गातून राज्यात दुसरा क्रमांक मिळवून घवघवीत यश मिळविले़ २०१६ मध्ये सहायक पोलीस निरीक्षकपदासाठी पात्र ठरल्यानंतर पोस्टाच्या चुकीमुळे लक्ष्मी डाकेवाड हिचे स्वप्न अपूर्ण राहिले होते़ मात्र, खचून न जाता दुसऱ्यांदा स्पर्धा परीक्षेला सामोरे जावून आपले ध्येय साध्य केले़
पदवीधर असलेल्या लक्ष्मी डाकेवार हिने सन २०१६ मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदासाठी लेखी पूर्व परीक्षा दिली होती. त्यामध्ये पात्र झाल्यानंतर मुख्य परीक्षेतही ती यशस्वी होऊन मैदानी परीक्षेत अनुक्रमे त्यातही पात्र ठरली. आता तोंडी परीक्षेची प्राथमिकता शिक्षक असल्याने पात्र विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कॉल लेटर पाठविले होते. पण ज्या तारखेला परीक्षा होती त्याच तारखेला पोस्टमनने पत्र पोहोचविल्याने नोकरी हुकली होती. मात्र, कठोर मेहनत, अपार जिद्द आणि प्रचंड महत्त्वाकांक्षा असली की कितीही मोठे यश संपादन करता येते. याप्रमाणे प्रयत्नाची पराकाष्ठा करुन नुकत्याच जाहीर झालेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेच्या निकालात लक्ष्मी डाकेवार हिने ओबीसी महिला प्रवर्गातून राज्यात दुसरा क्रमांक पटकावला़ पोस्टाच्या चुकीमुळे नोकरी हुकलेल्या लक्ष्मीने हताश न होता जिद्द व चिकाटीने मिळविलेले यश केवळ डाकेवार कुटंबासाठीच नव्हे, तर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी आहे. घरची आर्थिक परिस्थिती सामान्य असतानाही लक्ष्मीने नोकरी हुकल्याने न खचता एका नव्या आशेने स्पर्धा परीक्षेच्या प्रवाहात टिकून राहिल्याने ध्येय गाठू शकली. खरे तर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे आणि त्याहीपेक्षा एक फॅशन म्हणून करणारे अनेक विद्यार्थी बघायला मिळतात. परंतु जिद्दीने पेटून उठणारे अगदी सामान्य परिस्थितीतील विद्यार्थी आजही तेवढ्याच जिवाच्या आकांताने प्रयत्न करतात आणि एके दिवशी यशश्री त्यांच्या गळ्यात यशोमाला घालते. हेच लक्ष्मी डाकेवार हिच्या यशाने दिसून येते. यशाबद्दल पंचायत समिती सदस्या सुनीता इंगळे, सरपंच उमाबाई रिठेवाड, उपसरपंच रामराव बैलापुरे, सामाजिक कार्यकर्ते बळीराम इरलेवाड, नरहरी महाराज, विठ्ठल तरकंटे आदींनी लक्ष्मीचे स्वागत केले़
जिद्दीने पीएसआय होण्याचे स्वप्न केले पूर्ण
२०१७ साली कॉल लेटर मिळालेल्या दिवशीच मुलाखतीची वेळ होती. मुंबईला त्याच दिवशी पोहोचणे शक्य झाले नसल्याने पोस्टाच्या चुकीमुळे माझया तोंडाचा घास हिरावला गेला. पण माझे आई-वडील, भाऊ व गुरु यांच्या सहकार्याने व माझया जिद्दीने पीएसआय होण्याचे स्वप्न पूर्ण केले- लक्ष्मी डाकेवार,बेळकोणी (बु.)