मतांच्या ध्रुवीकरणाचा काँग्रेसला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 05:57 AM2019-05-26T05:57:31+5:302019-05-26T05:57:34+5:30
नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा ४० हजार मतांच्या फरकाने धक्कादायक पराभव झाला.
- विशाल सोनटक्के
नांदेड : नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा ४० हजार मतांच्या फरकाने धक्कादायक पराभव झाला. वंचित बहुजन आघाडीने १ लाख ६६ हजारांपर्यंत मारलेली मुसंडी आणि दलितांबरोबरच मुस्लिम आणि धनगर मतांचे काही प्रमाणात झालेले ध्रुवीकरण, मराठा मते भाजपाकडे वळविण्यासाठी प्रताप पाटील चिखलीकर यांनी आखलेली रणनिती यशस्वी झाल्याचे दिसते.
२०१४ च्या निवडणुकीत देशभरात मोदी लाट असतानाही अशोक चव्हाण हे तब्बल ८१ हजारांहून अधिकच्या मताधिक्याने निवडून आले होते. त्यामुळेच या निवडणुकीतही चव्हाण पुन्हा विजयी होतील, असा कयास बांधला जात होता. मात्र वंचित बहुजन आघाडीने नांदेडमध्ये कमालीचा जोर लावला.
अॅड. प्रकाश आंबेडकर आणि बॅ. असोसोद्दिन ओवेसी यांच्या पहिल्या सभेला नांदेडमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला. येथूनच मतांच्या ध्रुवीकरणास सुरुवात झाली. चव्हाण यांना ४ लाख ४६ हजार ६५८ मते मिळाली. तर भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर हे ४० हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले. चिखलीकर यांना ४ लाख ८६ हजार ८०६ इतकी मते मिळाली. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीच्या प्रा. डॉ. यशपाल भिंगे यांनी १ लाख ६६ हजार ९९६ मतांपर्यंत मजल मारली. भिंगे यांच्या याच मतांनी भाजपच्या विजयाचा मार्ग प्रशस्त
केला.
महानगरपालिकेसह जिल्हा परिषद आणि इतर महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्था नांदेडमध्ये काँग्रेसच्या ताब्यात आहेत. दीड वर्षापूर्वी झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने अक्षरश: एकतर्फी विजय मिळविला होता. अशा स्थितीत अवघ्या दीड वर्षात खुद्द अशोक चव्हाण यांचाच पराभव होतो, हे काँग्रेसच्या जिव्हारी लागणारे आहे. जिल्ह्यातील काँग्रेसच्या दुसऱ्या फळीबद्दल असलेली नाराजीही चव्हाण यांना भोवल्याची उघड चर्चा आता सुरू आहे.
>नांदेड होते
भाजपच्या रडारवर
दीड वर्षापूर्वी नांदेड महापालिका जिंकायचीच असा निर्धार करुन भाजप निवडणूक रिंगणात उतरली होती. त्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांसह निम्मे मंत्रिमंडळ नांदेडमध्ये होते. मात्र त्यानंतरही अशोक चव्हाण यांनी नांदेड महापालिकेची निवडणूक अक्षरश: एकतर्फी जिंकत भाजपचे वारु रोखण्याचे काम केले होते. हा पराभव प्रदेश भाजपच्याही जिव्हारी लागला होता. तेव्हापासूनच नांदेड भाजपच्या रडारवर होते. नरेंद्र मोदी यांची सभा झाली. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मतदारसंघात तब्बल ४ सभा घेतल्या. दुसरीकडे भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर हेही नांदेडमध्ये तळ ठोकून होते.