जिल्ह्यातील सर्वच गुरुजींना शाळांमध्ये हजर राहण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:13 AM2021-06-19T04:13:22+5:302021-06-19T04:13:22+5:30
जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव कमी असल्याने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या आदेशाने १०० टक्के उपस्थितीचे ...
जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव कमी असल्याने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या आदेशाने १०० टक्के उपस्थितीचे आदेश देण्यात आले आहेत.
शाळांमध्ये सर्व शिक्षकांनी उपस्थित राहून ऑनलाईन शिक्षणाबरोबरच गृहभेटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती साधावी.
विद्यार्थी आणि पालकांचा समन्वय घडवून आणावा, शिक्षकांनी दिलेला अभ्यास विद्यार्थी करत आहेत किंवा नाही याबाबत पालकांनी सजग राहावे, या अनुषंगाने गृहभेटीदरम्यान पालकांना आवाहन करावे.
शिक्षकांना विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्याबरोबरच इतरही कामे आहेत. त्यामध्ये निवडणूक विभाग, वृक्षारोपण तसेच कोराेना संबंधित इतर कामे असल्याने १०० टक्के उपस्थिती गरजेची आहे. हे लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डाॅ.विपीन इटणकर यांच्या सूचनेनसार उपस्थितीचे आदेश दिले आहेत.
- प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी, नांदेड.
शिक्षण संचालकांचे पत्र
विदर्भवगळता इतर विभागांतील शाळा १५ जूनपासून सुरू करण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी दिले आहेत. सदर पत्रात इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीच्या ५० टक्के शिक्षकांनी उपस्थित राहावे तर दहावी आणि इयत्ता बारावीचे शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी १००टक्के उपस्थित राहावे. कोविड-१९ मुळे पुढील सूचनेपर्यंत शाळा बंद असल्यातरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होणार नाही, त्यांचे ऑनलाईन व इतर माध्यमातून शिक्षण सुरळीत ठेवावे, असे आदेशात म्हटले आहे.
राज्यामध्ये बहुतांश, शेजारच्या जिल्ह्यामध्ये विशेषत: शंभर टक्के शिक्षकांना शाळेत उपस्थित राहणेसंदर्भात बोलावत नसल्यामुळे शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी म्हणून शिक्षक आमच्याकडे पन्नास टक्के उपस्थितीच्या संदर्भात आग्रह धरतात त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी शिक्षकाच्या भावनांचा आदर करावा आणि पन्नास टक्के उपस्थिती शिक्षकांची शाळेवर सध्या ग्राह्य धरण्यात यावी.
- जी. एस. मंगनाळे (राज्य उपाध्यक्ष) महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना