जिल्ह्यात हॉटेल्स, बार, जीम बंद ठेवण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:17 AM2021-03-18T04:17:38+5:302021-03-18T04:17:38+5:30
जिल्ह्यात १७ मार्च रोजी कोरोना रुग्णांनी पुन्हा एकदा आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. रुग्णांचा ५९७चा नवा आकडा पुढे आला आहे. ...
जिल्ह्यात १७ मार्च रोजी कोरोना रुग्णांनी पुन्हा एकदा आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. रुग्णांचा ५९७चा नवा आकडा पुढे आला आहे. यात नांदेड शहरातील ३५१ रुग्णांचा समावेश आहे. आठ दिवसांपासून रुग्णसंख्येत सातत्याने वाढच होत आहे. परिणामी, प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या स्वरूपाची रूपरेषा नव्याने निश्चित करण्यात आली आहे. जिल्ह्यात हॉटेल्स, रेस्टॉरंट, धाबे, परमीट रूम, बेकरी, स्वीटमार्ट, चाट भांडार आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने, हे सर्व प्रकारचे हॉटेल्स, खाद्यगृह, धाबे, बेकरी, परमीट रूम, स्वीटमार्ट, चार्ट भांडार १७ मार्च ते ३१ मार्चदरम्यान पार्सल सेवा वगळता, पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. होम डिलिव्हरीचे किचन रात्री १० पर्यंत कोरोना नियमावलीचे पालन करीत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.
दुसरीकडे जिल्ह्यात सर्व जीम, व्यायामशाळा, उद्याने हेही ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांनी मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर आदी कोरोना नियमावलीचे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
चौकट
-----------
जनजागृती सप्ताह सुरू करण्याचे निर्देश
जिल्ह्यात सर्व विभागांनी कोरोना जनजागृती सप्ताह सुरू करून, कोरोना नियमावलींचे पालन करण्याबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करावी, असे आदेशही देण्यात आले आहे. बुधवारी सायंकाळी झालेल्या बैठकीनंतर हे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध साथरोग कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.