सगरोळीच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 12:30 AM2019-06-04T00:30:22+5:302019-06-04T00:31:07+5:30
गौण खनिजाच्या वाहतुकीसाठी बोगस पावत्यांचा वापर करणाऱ्या सगरोळी येथील घाट घेणाºया ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत.
नांदेड : गौण खनिजाच्या वाहतुकीसाठी बोगस पावत्यांचा वापर करणाऱ्या सगरोळी येथील घाट घेणाºया ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत. २ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी मरखेलनजीक तपासलेल्या २७ वाळूच्या गाड्यांमध्ये बोगस पावत्या आढळल्या होत्या. जिल्हाधिकारी यांनी कारवाई करुनही या प्रकरणात संबंधित मात्र मोकळे असल्याचे वास्तव २ जून रोजी ‘लोकमत’ ने उघड केले होते.
मुखेड येथील पाणीटंचाईची बैठक आटोपून देगलूरकडे मरखेलमार्गे जात असताना २ मे रोजी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी वाळूच्या गाड्यांची तपासणी केली होती. या तपासणीत गौण खनिज वाहतुकीच्या पावत्या त्यांनी तपासल्या होत्या. त्यात एक नव्हे, दोन नव्हे तर सात पावत्या बोगस आढळल्या.उर्वरित २० ट्रकचालक ट्रक जागेवरच ठेवून पळून गेले होते. त्यामुळे या संपूर्ण वाहनांच्या पावत्या बोगस असल्याचा प्रकार स्पष्ट झाला होता. ही वाहने देगलूर तहसीलने ताब्यात घेत दंडात्मक कारवाई केली. त्याचबरोबर ट्रक चालकाविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. ही सर्व प्रक्रिया संथगतीने सुरु होती. त्याचवेळी गौण खनिज वाहतुकीच्या बोगस पावत्या आल्या कुठून? हा मूळ प्रश्न उपस्थित झाला होता. याबाबत देगलूर प्रशासन चौकशीचा भाग हा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे असल्याचे सांगत होते. तर जिल्हाधिकारी कार्यालयातून स्थानिक प्रशासन या प्रकरणात कारवाई करत असल्याचे सांगत होते. एकूणच हा प्रकार टोलवाटोलवीचाच होता. खुद्द जिल्हाधिकारी यांनी कारवाई करुन एखाद्या प्रकरणात कारवाई होत नसेल तर अन्य प्रकाराकडे कानाडोळाच होत असल्याचे दिसून येत होते. या बाबत २ जून रोजी ‘लोकमत’ ने सदर प्रकारावर प्रकाश टाकला होता. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी या बाबीची गंभीरतेने दखल घेत बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील वाळू घाट घेणाºया ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. हा गुन्हा दाखल होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. बोगस पावत्या आल्या कुठून ? याचाही छडा लावण्यात येईल. बोगस पावत्या ट्रकचालकांनी आणल्या की ठेकेदाराने? याचा तपास सुरुच आहे. त्याचवेळी ठेकेदार हा घाटावरील सर्व बाबीला जबाबदार असल्याने त्याच्यावर पहिल्यांदा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डोंगरे यांनी स्पष्ट केले.