आरटीओचा डोळा चुकवित परप्रांतीय वाहनांचा धुडगूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 12:47 AM2019-04-28T00:47:51+5:302019-04-28T00:50:25+5:30
कोणतीही मार्गपरवानगी न घेता नांदेड जिल्ह्यातून राज्यातील मोठ्या शहरांमध्ये सर्रासपणे परप्रांतीय खाजगी ट्रॅव्हल्सची प्रवासी वाहतूक सुरु असून
नांदेड : कोणतीही मार्गपरवानगी न घेता नांदेड जिल्ह्यातून राज्यातील मोठ्या शहरांमध्ये सर्रासपणे परप्रांतीय खाजगी ट्रॅव्हल्सची प्रवासी वाहतूक सुरु असून त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे़ तर दुसरीकडे दहा प्रवाशांची क्षमता असलेल्या वाहनातून तब्बल २४ प्रवाशांची धोकादायक पद्धतीने वाहतूक केली जात आहे़ या सर्व प्रकाराकडे आरटीओकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे़
इतर राज्यांतील वाहनांना दुसऱ्या राज्यात जर प्रवासी वाहतूक करावयाची असेल तर त्यासाठी मार्ग परवानगी घ्यावी लागते़ परंतु नांदेडात धावणा-या उत्तर प्रदेशाच्या ४, पाँडीचेरीच्या २, कर्नाटकच्या २, ओडीसा २, छत्तीसगड ४ यासह दररोज नांदेड-बीदर धावणा-या घरगुती वापराच्या ५० हून अधिक वाहनांकडून कोणतीही परवानगी न घेता प्रवाशांची वाहतूक केली जाते़ नांदेडातील ट्रॅव्हल्सचालकांना आरटीओकडे तीन महिन्याला ५७ हजार ७५० रुपयांचा कर भरावा लागतो़ याउलट परप्रांतीय वाहने मात्र चिरीमिरी देवून बिनदिक्कतपणे राज्यात धुमाकूळ घालत आहेत़ याबाबत नांदेड जिल्हा टॅक्सी परवानाधारक संघटनेनेही तक्रारही केली आहे़परंतु, त्याची दखल घेण्यात आली नाही़ तर दुसरीकडे सवलतीचा लाभ घेणा-या जवळपास ३०० स्कूल बसकडून लग्नसराईत व-हाडी मंडळीची वाहतूक करण्यात येत आहे़
२८ एप्रिलला तर शहरातील सर्व ३०० स्कूल बसेस बुक आहेत़ एकीकडे नियमबाह्यरित्या होणा-या या वाहतुकीकडे दुर्लक्ष करुन शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असताना दुसरीकडे वाहनधारकांना फिटनेस प्रमाणपत्रासाठी मात्र तीन-तीन महिने ताटकळत ठेवण्यात येत आहे़ एक महिना अगोदर आॅनलाईन नोंदणी केल्यानंतर फिटनेस प्रमाणपत्र देण्यासाठी तब्बल अडीच ते तीन महिने लागत आहेत़ एवढे दिवस वाहन उभे ठेवणे शक्य नसून त्यामुळे प्रामाणिक वाहनचालकांचे यामध्ये मोठे नुकसान होत आहे़
कारवाई करणार
स्कूलबस वाहनाच्या परवानगीमध्ये कुठेही प्रवासी वाहतूक करण्याचा उल्लेख नाही़ त्यामुळे स्कूल बसचालकांनी नियमाप्रमाणेच वाहतूक करावी़ अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल़तसेच परराज्यातील वाहने नांदेडात धावत असल्याचे अद्याप तरी, निदर्शनास आले नाही़ त्यासाठी लवकरच तपासणी मोहीम सुरु करण्यात येणार असून अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई करणार असल्याची प्रतिक्रिया उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी दिली़