आमचा प्रत्येक दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’; रितेश देशमुख यांच्या प्रश्नावर अशोकराव, अमिता चव्हाण यांची दिलखुलास उत्तरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 08:13 PM2020-02-15T20:13:56+5:302020-02-15T20:22:33+5:30
कै़शंकरराव चव्हाण यांच्या करड्या शिस्तीत गेलेले बालपण, मुंबईतील अशोकराव चव्हाण यांचा महाविद्यालयीन काळ, त्याच काळात अमिता यांच्यासोबतचे प्रेम प्रकरण, त्यानंतरची राजकीय कारकीर्द, शंकरराव चव्हाण, शरद पवार, विलासराव देशमुख आणि अशोकराव चव्हाण यांच्यातील स्रेहसंबंध या सर्व बाबींचा उलगडा या प्रकट मुलाखतीत झाला़
- विशाल सोनटक्के
नांदेड : 'आमचा प्रत्येक दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ असतो़ एकमेकांच्या चेहऱ्यावरूनच मनात काय सुरू आहे याचा उलगडा होतो' असे सांगत अशोक चव्हाण यांनी अमिता चव्हाण यांना शुक्रवारी सर्वांसमक्ष गुलाबाचे फूल दिले़ निमित्त होते डॉ़ शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘आनंदाचे डोही’ या कार्यक्रमांतर्गत अभिनेता रितेश देशमुख यांनी घेतलेल्या या दोघांच्या प्रकट मुलाखतीचे.
कै़शंकरराव चव्हाण यांच्या करड्या शिस्तीत गेलेले बालपण, मुंबईतील अशोकराव चव्हाण यांचा महाविद्यालयीन काळ, त्याच काळात अमिता यांच्यासोबतचे प्रेम प्रकरण, त्यानंतरची राजकीय कारकीर्द, शंकरराव चव्हाण, शरद पवार, विलासराव देशमुख आणि अशोकराव चव्हाण यांच्यातील स्रेहसंबंध या सर्व बाबींचा उलगडा या प्रकट मुलाखतीत झाला़ येथील यशवंत महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या या मुलाखतीतून कै़शंकरराव चव्हाण यांच्या कार्याबरोबरच त्यांचा स्वभावही उलगडत गेला़
शंकरराव नाना अतिशय कडक शिस्तीचे होते़ त्यांची भीती वाटायची का? इयत्ता ८ वीत असताना शाळेत दप्तर हरविल्यानंतर तासभर तुम्ही त्यांच्या रुममध्ये होतात, त्या तासात काय घडले अशी गुगली रितेश देशमुख यांनी टाकल्यानंतर वेगळं काही घडलं नाही, खोलीत नानांनी स्कूल बॅग हरवल्याबद्दल उलट तपासणी निश्चितपणे घेतली़ मात्र त्यानंतर आयुष्यात माझी कुठलीच गोष्ट कधी हरवली नाही, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले़
मुंबईत शालेय जीवन गेले़ आपले वडील मुख्यमंत्री, मंत्री आहेत, याचे दडपण यायचे का? या प्रश्नावर आपली ओळख समोर आल्यानंतर पाहणाऱ्याचा दृष्टिकोन बदलतो़ तसे होवू नये म्हणून तशी ओळख सांगण्याचे शक्यतो टाळायचो़ मात्र मुंबईने मला खूप काही शिकविले आणि दिलेही़ महत्त्वाचे म्हणजे मुंबईत जात, पात, धर्मभेद कधीही दिसला नाही़ मुंबईने महाराष्ट्राला दिलेली ही मोठी देणगी असून मुंबईची ती शानही असल्याचे चव्हाण म्हणाले़
कै़शंकरराव चव्हाणांचा सर्वच क्षेत्रांत आदरपूर्वक दरारा होता़ तुम्ही तुमच्या शिक्षण करिअरचे निर्णय घेताना त्यांच्याशी चर्चा व्हायची का? या प्रश्नावर शंकरराव चव्हाणांशी छोट्यामोठ्या सर्व गोष्टींवर चर्चा व्हायची, मात्र कधीही त्यांनी त्यांची मते आमच्यावर लादली नसल्याचे सांगत त्याकाळी डॉक्टर-इंजिनिअर व्हावे अशी चर्चा होती़ मात्र मला मॅनेजमेंट क्षेत्रात जायचे होते, आणि पदवीनंतर मी एमबीए केले़ तो माझा चॉईस होता़ आज त्याचा मला राजकारणातही उपयोग होतो आहे़
तुम्ही एखाद्या अभिनेत्याप्रमाणे देखणे आहात़ महेश मांजरेकरांसारखे मित्र सोबत होते, कधी चित्रपटात यावे असे वाटले नाही का? यावर आता वेळ निघून गेली़ बोलण्यात काय अर्थ? असे सांगत तसा कधी विचार केला नाही, परंतु मला चित्रपट आवडतो़ १९७५ चा काळ राजेश खन्ना, अमिताभचा होता़ फस्ट डे फस्ट शो असा आमचा कार्यक्रम असायचा़ चित्रपट पहावा आजही वाटते़ मात्र वेळ मिळत नसल्याची खंतही चव्हाण यांनी बोलून दाखवली़
चित्रपटानंतर अशोक चव्हाण व अमिता यांच्या प्रेम प्रकरणाकडे वळत रितेश देशमुख यांनी थोडा खाजगी पण आजच्या व्हॅलेंटाईन दिनी महत्त्वाचा असलेला प्रश्न विचारतो, असे सांगत आपली लव्ह स्टोरी कशी जुळली? आणि त्याला घरातून मान्यता कशी मिळाली? असे विचारले़
यावर चव्हाण दाम्पत्यांनी पूर्ण लव्ह स्टोरी उपस्थितांसमोर उलगडली़ ७५-७६ मध्ये मी आणि अमिता आम्ही दोघे एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होतो़ अशोक चव्हाण सह्याद्रीमध्ये राहायचे़ त्याच्या पुढे जवळच आमचे घर होते़ त्यांच्या प्रामाणिकपणा, दिलेल्या शब्दाला जागण्याचा स्वभाव भावल्याचे सांगत त्यातूनच आम्ही एकत्रित आल्याच्या भावना अमिता चव्हाण यांनी व्यक्त केल्या़ आयुष्यात घडते ते विधीलिखीत असते असे सांगत आज दोन मुलींसह चांगला संसार सुरू असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले़
लव्ह मॅरेज करा, पण आयुष्यभर निभवा
अशोकराव आणि अमिता चव्हाण यांचे प्रेमसंबंध होते़ त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर हे शंकररावांना सांगायेच कसे हा दोघांसमोरही प्रश्न होता़ याबाबत बोलताना अशोकराव म्हणाले, आम्हाला वाटायचं दुसऱ्या कोणाला माहीत नाही, मात्र ही बाब सर्वांनाच समजलेली होती़ आम्ही भिन्नधर्मीय, त्यामुळे आणखी भीती होती़ सुरुवातीला घरात एकमत होत नव्हतं़ मात्र कै़शंकररावांना जे आहे ते सांगितलं त्यांनी लव्ह मॅरेज करा, परंतु ते निभावलेही पाहिजे असे सांगत आमच्या लग्नाला मान्यता दिली़ यावर मी थेट मुंबईहून नांदेडमधील धनेगावात आले़ मात्र चव्हाण कुटुंबियांनी प्रेमाने स्वीकारीत सन्मानाने वागविल्याचे अमिता चव्हाण यांनी सांगितले़
फूल देऊन २० वर्षे झाली, अजूनही निरोप नाही
आज व्हॅलेंटाईन डे आहे़ त्यामुळे तुमचे प्रेम कसे जुळले? असा प्रश्न अशोकराव यांनी रितेश देशमुख यांना केला़ यावर शालेय जीवनात मी कधीही मुलींशी बोललो नाही़ अशाच एका व्हॅलेंटाईन डे दिवशी मी एकीला फूल पाठविले होते, मात्र त्याचे २० वर्षे उलटली तरी उत्तर मिळालेले नसल्याचे रितेश यांनी अत्यंत मिश्कील शब्दात सांगितले़ यावेळी रितेश देशमुख यांनी चित्रपट क्षेत्रातील प्रवेश कसा झाला हेही उलगडले़ अमेरिकेतून आल्यावर मला 'तुझे मेरी कसम' या चित्रपटाची आॅफर आली़ हैदराबादला जाऊन चित्रपटाचे कथानक ऐकले आणि आवडलेही़ पण पप्पांना (विलासराव देशमुख) विचारायचे कसे असा प्रश्न होता़ एके दिवशी धाडस करून त्यांना विचारले, त्यावर ते म्हणाले, तुझा निर्णय तू घे़ तेव्हा उद्या चित्रपट चालणार नाही तर लोक रितेशने नव्हे तर विलासरावांच्या मुलाने वाईट अभिनय केल्याचे म्हणतील, यावर मी माझ्या नावाची काळजी घेतो, तू तुझ्या नावाची घे असे विलासरावांनी सांगितल्याचे रितेश म्हणाला़
मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर दीड वर्षे चव्हाण कुुटुंबीय राहिले आमदार निवासात
शंकरराव चव्हाण यांची राहणी साधी होती़ त्यांनी कधीही सत्ता संपत्तीला महत्त्व दिले नाही़ त्यामुळेच आणीबाणीनंतर काँग्रेसचा पराभवाला सामोरे जावे लागले़ मुख्यमंत्री पद सोडल्यानंतर मुंबईत राहायचे कुठे असा प्रश्न निर्माण झाला़ कारण मुंबईत स्वत:चे घर नव्हते़ त्यावेळी आमदार निवासातील आमची एक आ़साहेबराव बारडकरांच्या खोलीत आम्ही दीड ते दोन वर्षे सहकुटुंब राहिल्याची आठवणही अशोकराव चव्हाण यांनी यावेळी सांगितली़
शंकरराव, शरद पवार, विलासरावांचे नाते
शरद पवार आजही तरुणाला लाजवेल अशा पद्धतीने सक्रिय आहेत़ चव्हाण आणि पवार कुटुंबीय यांच्यातील संघर्षाची चर्चा होते़ मात्र तसे नव्हते़ काही विषयावर संघर्ष व्हायचा मात्र पवार आणि विलासरावांच्या कुटुंबियासोबत आमचे नाते कालही आणि आजही जिव्हाळ्याचे आहे़ दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यानंतर शंकररावांनी मंत्रिमंडळाचे खातेवाटप करण्याची जबाबदारी विलासरावांवर सोपवली होती़ विलासरावातील नेतृत्वाचे गुण पाहून १९८० पासून त्यांना शंकररावांनीच ताकद देण्यास सुरुवात केली़ पवारांशी पण नेहमीच चांगले संबंध राहिले़ संघर्ष व्हायचा तो मराठवाड्याच्या विविध प्रश्नासंदर्भात़, असे अशोकराव चव्हाण यांनी सांगितले़
देशमुख-चव्हाण कुटुंबियांचा असाही योगायोग
शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री आणि त्यानंतर मंत्री असताना त्यांना मुंबईतील ‘रामटेक’ हा बंगला मिळाला होता़ याच बंगल्यात अशोकराव चव्हाण यांचे बालपण गेले़ सुमारे १० ते १२ वर्षे हा बंगला चव्हाण कुटुंबियाकडे होता़ विलासराव देशमुख मंत्री असताना त्यांनाही रामटेकच मिळाला होता़ त्या बंगल्यात रितेश देशमुखही कुटुंबियासह दहा-बारा वर्षे राहिले़ या दोघांचे शिक्षणही मुंबईतच झाले़ विशेष म्हणजे, अशोकराव चव्हाण यांच्या आईचे नाव कुसुम होते़ तर रितेश देशमुख यांच्या आई वैशालीताई यांचेही मूळ नाव कुसुम असेच असल्याचा योगायोग या मुलाखतीतून पुढे आला़ यावेळी अशोकराव चव्हाण यांनीही रितेश देशमुख यांना काही प्रश्न विचारले़ सिने क्षेत्रात पदार्पण करण्याचा निर्णय कसा घेतला, त्याला विलासराव देशमुख यांनी संमती कशी दिली, पहिला चित्रपट तुझे मेरी कसम याबाबतच्या आठवणीही रितेश देशमुख यांनी सांगितल्या