डेंग्यूच्या साथीने धडकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:39 AM2021-09-02T04:39:32+5:302021-09-02T04:39:32+5:30
जिल्ह्यात महिनाभरापासून ताप, खोकला, सर्दी या आजाराचे रुग्ण वाढले आहेत. मोठ्या प्रमाणात उपचारासाठी शासकीय तसेच खासगी रुग्णालयात गर्दी होत ...
जिल्ह्यात महिनाभरापासून ताप, खोकला, सर्दी या आजाराचे रुग्ण वाढले आहेत. मोठ्या प्रमाणात उपचारासाठी शासकीय तसेच खासगी रुग्णालयात गर्दी होत आहे. त्यातही मुलांची संख्या अधिक आहे. सध्या वातावरणातील बदलामुळे तापाच्या आजाराची साथ पसरली असल्याचे सांगितले जात आहे. प्रत्येक नगरात तापाचे रुग्ण आहेत. त्यात रुग्णालयात उपचारासाठी गेल्यानंतर खासगी डॉक्टर डेंग्यूसह मलेरिया, टायफाइडची तपासणी करण्याचा सल्ला देत आहेत. यातून पुन्हा भीती वाढत आहे.
खासगी रुग्णालयात विशेषत: बालरुग्णालयात रुग्णांची संख्या मोठी आहे. अनेक बालरुग्णालये हाउसफुल्ल आहेत.
महापालिका हद्दीत डेंग्यू रुग्णाचे प्रमाण अधिक असल्याचेही सांगितले जात आहे. महापालिका आरोग्य विभागानेही जवळपास ६० हजारांहून अधिक घरांचा कंटेनर सर्व्हे पूर्ण केला आहे. फॉगिंग मशीनही वापरात आणले जात असून, त्याचा उपयोग होत आहे. मात्र बदलत्या वातावरणात नागरिकांनी काळजी घ्यावी. त्याचवेळी स्वच्छता राखावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
शहरातील खासगी डॉक्टरांना डेंग्यू रुग्णाबाबत महापालिका तसेच शासकीय रुग्णालयास कळवणे बंधनकारक आहे. याबाबत डॉक्टरांना आरोग्य विभागाकडून पत्रही पाठविण्यात आले आहे. व्हायरल तापाच्या रुग्णातील प्लेटलेट्स कमी होताच डेंग्यू झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र अचूक निदानासाठी शासकीय रुग्णालयातील तपासणीच आवश्यक असल्याचेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी कोरडा दिवस पाळावा. शक्य नसल्यास वापरण्यात येणाऱ्या अबेट औषधी टाकावी, असे आवाहनही केले आहे.
व्हायरल तापाची साथ
जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून व्हायरल तापाची साथ आहे. तापाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढले आहेत. मात्र तीन ते पाच दिवसात आजार बरा होतो. त्यामुळे नागरिकांनी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात जाऊन उपचार घ्यावेत. डेंग्यूच्या आजाराचे काही रुग्ण असले तरी साथसदृश परिस्थिती नाही. डेंग्यू रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर मोहीम सुरू आहे. नागरिकांनीही स्वच्छता तसेच कोरडा दिवस पाळणे गरजेचे आहे.
- डॉ. बालाजी शिंदे,
जिल्हा आरोग्य अधिकारी, नांदेड
एका महिन्यात १६ रुग्ण
जिल्ह्यात ऑगस्टमध्ये ११६ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील १६ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचवेळी मुखेड तालुक्यातील कृष्णावाडी येथील एका रुग्णाचा मृत्यूही झाला आहे. आरोग्य विभागाकडून डेंग्यू रोखण्यासाठी कंटेनर मोहीम राबविली जात आहे. विशेष म्हणजे खासगी रुग्णालयातील रुग्णाबाबतचे अहवाल शासकीय रुग्णालय तसेच जिल्हा हिवताप कार्यालयात पाठविणे गरजेचे आहे. डेंग्यूबाबत येथेच अधिकृत निदान केले जाते.
- डॉ. आकाश देशमुख,
जिल्हा हिवताप अधिकारी, नांदेड