औषधींसह तपासण्यांसाठी बाहेरचा रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 12:28 AM2019-01-12T00:28:49+5:302019-01-12T00:30:39+5:30
विष्णूपुरी येथील डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या काही महिन्यांपासून औषधींचा प्रचंड तुटवडा आहे़ त्यामुळे गरीब रुग्णांना पदरचे पैसे खर्च करुन बाहेरुन औषधी आणावी लागते़
शिवराज बिचेवार।
नांदेड : विष्णूपुरी येथील डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या काही महिन्यांपासून औषधींचा प्रचंड तुटवडा आहे़ त्यामुळे गरीब रुग्णांना पदरचे पैसे खर्च करुन बाहेरुन औषधी आणावी लागते़ आता त्यात पॅथॉलॉजी विभागातील कुल्टर ही मशीन बंद पडल्यामुळे रुग्णांच्या तपासण्या करण्यासाठीही त्यांना बाहेरच्या लॅबचा रस्ता दाखविण्यात येत आहे़ त्यामुळे गरीब रुग्णांची अक्षरश: पिळवणूक करण्यात येत आहे़ या सर्व आर्थिक उलाढालीसाठी रुग्णालयात मोठी टोळीच कार्यरत असल्याचे दिसून येते़
कोट्यवधी रुपये खर्च करुन विष्णूपुरी येथे अत्याधुनिक सोयीसुविधा असलेले महाविद्यालय अन् रुग्णालय उभारण्यात आले़ परंतु प्रशासकीय उदासीनता आणि शासनाचे दुर्लक्ष यामुळे गोरगरिबांसाठी असलेले हे रुग्णालय दलालांचे माहेरघर झाले आहे़ शासनाकडून रुग्णालयाला औषधी पुरवठा करण्यात हात आखडता घेतल्यामुळे मोजकेच पैसे घेवून रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या गोरगरीब रुग्णांना गेल्या काही महिन्यांपासून बाहेरुन औषधी खरेदी करावी लागत आहे़ त्यामध्ये इंजेक्शनसह इतर औषधीचा समावेश आहे़ रुग्णालयातील डॉक्टरांकडे बाहेर असलेल्या औषधी दुकानांचे लेटरपॅडच त्यासाठी उपलब्ध आहे़ ठरावीक औषध विक्रेत्यापासूनच औषधी खरेदी करावी, असा सल्लाही डॉक्टर मंडळी रुग्णांच्या नातेवाईकांना देत आहेत़ त्यात दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या रुग्णांच्या रक्त, लघवी, प्लेटलेट, शुगर, अॅनिमिया, किडनी, लिव्हरच्या तपासण्यांसाठी रुग्णालयाबाहेर असलेल्या पॅथॉलॉजी लॅबचा रस्ता दाखविण्यात येत आहे़ रुग्णालयात असलेल्या पॅथॉलॉजी विभागातील कुल्टर ही मशीन दुरुस्तीअभावी बंद पडली आहे़ या मशीनची दोन लाखांची रक्कम संबंधित कंपनीला देणे असल्यामुळे कंपनीकडून मशीनची दुरुस्ती करण्यात येत नसल्याची माहिती हाती आली आहे़ त्यामुळे फक्त स्लायडींगवर होणाऱ्याच किरकोळ तपासण्या या ठिकाणी होत असून इतर तपासण्यांसाठी रुग्णांना बाहेरच्या लॅबमध्ये हजारो रुपये मोजावे लागत आहेत़ तपासण्यांच्या नावाखाली होणाºया या लुटीमागे मोठी साखळीच कार्यरत असल्याचे दिसून येते़ या सर्व प्रकारात मात्र मोठ्या अपेक्षेने शासकीय रुग्णालयात दाखल झालेल्या गोरगरिबांची पिळवणूक होत आहे़
तीन कुल्टर मशीनची आवश्यकता
शासकीय रुग्णालयात नांदेडसह शेजारील जिल्ह्यांतून दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात़ यातील जवळपास प्रत्येक रुग्णांचा पॅथॉलॉजी विभागाशी विविध तपासण्यांच्या संदर्भाने संपर्क येतो़ त्यामुळे तपासण्यांची संख्या लक्षात घेता या ठिकाणी किमान तीन कुल्टर मशीनची आवश्यकता आहे़ परंतु, उपलब्ध असलेल्या मशीनच्या दुरुस्तीचेच अनेक दिवस भिजत घोंगडे आहे़ त्याचा फटका मात्र गरिबांना बसत आहे़
तपासण्यांसाठी गरिबांवर हजारोंचा भूर्दंड
- रुग्णांच्या शरीरातील हिमोग्लोबीन, प्लेटलेटची संख्या, शुगर, लिव्हर, किडनी, कॅल्शिअम यासारख्या अनेक तपासण्या या कुल्टर मशीनवर करण्यात येतात़ तर स्लायडिंगवर मलेरिया, अॅनिमिया याच्या तपासण्या करण्यात येतात़ परंतु कुल्टर मशीनच बंद असल्यामुळे या तपासण्या करण्यासाठी प्रत्येक रुग्णाला किमान हजार ते दीड हजार रुपये मोजावे लागत आहेत़ विशेष म्हणजे, लॅबचे प्रतिनिधी रुग्णालयात येवून तपासणीसाठीचे नमुने घेवून जात आहेत़ प्रशासनाच्या बेफिकीरपणामुळे रुग्णालयाबाहेर असलेल्या पॅथॉलॉजी लॅबला मात्र अच्छे दिन आले आहेत़
- पॅथॉलॉजी विभागात स्लायडींगवर तपासण्या करण्यात येत आहेत. विभागातील कुल्टर ही मशीन बंद आहे़ त्याच्या दुरुस्तीचे प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत़ परंतु या सर्व प्रकारात कोण-कोण गुंतलेय याची आम्ही चौकशी करु, अशी प्रतिक्रिया वैद्यकीय अधीक्षक डॉ़यादव चव्हाण यांनी दिली़