दीड हजारांवर शेतकऱ्यांना मिळाली सौर कृषीपंप जोडणी, ६८७ शेतकरी प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 05:25 PM2020-11-24T17:25:53+5:302020-11-24T17:27:12+5:30
सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा केला जात नसल्याने बहुतांश शेतकरी पर्यायी मार्ग म्हणून सौर वीजपंपाचा वापर करीत आहेत.
नांदेड : जिल्ह्यात मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेअंतर्गत जवळपास २२०० शेतकऱ्यांनी कोटेशन भरले असून त्यापैकी १५१३ शेतकऱ्यांना कृषीपंपांची जोडणी दिली आहे. तर उर्वरित ६८७ शेतकऱ्यांच्या सौर कृषीपंप जोडणीचे काम अंतिम टप्प्यात आहे.
सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा केला जात नसल्याने बहुतांश शेतकरी पर्यायी मार्ग म्हणून सौर वीजपंपाचा वापर करीत आहेत. त्यात सबसिडी मिळणारे सौरपंप मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेतून मिळविण्यासाठी ६ हजार ९४९ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी ३ हजार ५२ अर्ज रद्द झाले. छाननीत वैध झालेल्या अर्जदारांपैकी २२०० शेतकऱ्यांनी कोटेशन भरले आहेत. त्यात २१५७ शेतकऱ्यांनी वेंडरची निवड केली आहे. दरम्यान, ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात अतिवृष्टी झाल्याने सौरपंप उभारणीसाठी लागणारे साहित्य शेतात निर्धारित वेळेत पोहोचू शकले नव्हते. परंतु, मागील महिनाभरापासून सदर कामास गती मिळाली आहे.
निवडलेल्या कंपन्यांना किती उद्दिष्ट?
जिल्ह्यात १३ कंपन्यांपैकी सर्वाधिक ६८० लक्ष असलेल्या टाटा पॉवर सोलार कंपनीने ५६३ पंप बसविलेले आहेत. त्यानंतर सीआरआय पंप- २८८ पैकी २५९ पंप बसविले, रवींद्र एनर्जी - ८४ पैकी ३९, मुद्रा सोलार - ७७ पैकी १३, जैन एरिगेशन ४४ पैकी ४३, एल ॲण्ड टी- १९३ पैकी १०९, स्पॅन - ३९१ पैकी ३००, शक्ती - १६४ पैकी ९३, रोटोमॅग- ३५ पैकी ००, नोवास ग्रीन - १२७ पैकी ५०, क्लरो - २१ पैकी १९, रॉमेट- १८ पैकी ००, जीके एनर्जी ३१ पैकी २५ सोलार पंप.
कोरोनामुळे टाळेबंदी आणि नंतर सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सौर पंपासाठी लागणारे साहित्य शेतात पोहोचविण्यासाठी अडचणी येत होत्या. परंतु, आता सदर कामास गती मिळाली नाही. लवकरात लवकर सोलार पंप शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न महावितरण करत आहे.
-संतोष वहाणे, अधीक्षक अभियंता, नांदेड