पी. विठ्ठल यांच्या 'शून्य एक मी' कवितासंग्रहाला 'गदिमा पुरस्कार'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 12:41 PM2018-09-21T12:41:34+5:302018-09-21T12:42:55+5:30
नव्या पिढीतील प्रसिद्ध कवी पी. विठ्ठल यांच्या 'शून्य एक मी' या कवितासंग्रहाला महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेच्या वतीने दिला जाणारा गदिमा काव्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
नांदेड : नव्या पिढीतील प्रसिद्ध कवी पी. विठ्ठल यांच्या 'शून्य एक मी' या कवितासंग्रहाला महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेच्या वतीने दिला जाणारा गदिमा काव्य पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्येष्ठ कवी आणि गीतकार ग. दि. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हा पुरस्कार देण्यात येणार आहे. पी. विठ्ठल यांच्यासह डॉ. अनुजा जोशी, गोवा आणि संजय चौधरी, नाशिक यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
साहित्य पुरस्कारासोबतच गेल्या 25 वर्षांपासून विविध क्षेत्रातील मान्यवरांना मसापच्या भोसरी शाखेच्या वतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यावर्षी ज्येष्ठ अभिनेते रमेश आणि सीमा देव यांना जीवनगौरव, चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना चित्रमहर्षी तर प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांना शब्दयात्री पुरस्कार दिला जाणार आहे. येत्या 2 ऑक्टोबर 2018 रोजी या पुरस्काराचे वितरण होणार असून यावेळी माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, आमदार महेश लांडगे, पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव, श्रीधर माडगूळकर, निमंत्रक पुरुषोत्तम सदाफुले आदी उपस्थित राहणार आहेत.
डॉ. पी.विठ्ठल हे नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भाषा संकुलात प्राध्यापक असून डॉ.आंबेडकर अध्यासन केंद्राचे प्रमुख आहेत. नव्वदोत्तर पिढीतील महत्वाचे कवी आणि अभ्यासक असलेल्या पी. विठ्ठल यांचे 'माझ्या वर्तमानाची नोंद', 'शून्य एक मी' हे त्यांचे संग्रह प्रसिद्ध आहेत. याशिवाय ' करुणेचा अंत: स्वर', ' संदर्भ: मराठी भाषा', ' जागतिकीकरण, सामाजिक वास्तव आणि समकालीन मराठी कविता' या पुस्तकांसह चार महत्त्वाची संपादने त्यांनी केली आहेत. त्यांच्या कवितांचे हिंदी आणि इंग्रजीत भाषांतर झाले असून महाराष्ट्रातील काही विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात त्यांच्या कवितांचा समावेश झालेला आहे.