जिल्ह्यात लसीकरणाची कासवगती; गरज रोज २0 हजारांहून अधिक डोसची, मिळतात केवळ दोन हजार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:18 AM2021-05-12T04:18:15+5:302021-05-12T04:18:15+5:30
नांदेड : जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. दुसऱ्या लाटेत अनेकांना आपल्या जीवाला मुकावे लागले ...
नांदेड : जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. दुसऱ्या लाटेत अनेकांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. पहिल्या लाटेत अनेक नागरिक लसीकरण करून घेण्यास तयार नव्हते. आता मात्र दुसऱ्या लाटेत लसीकरणाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहेय; परंतु मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने अनेक केंद्रावरून नागरिकांना आल्यापावली माघारी परत यावे लागत आहेत. लस मिळत नसल्याने नागरिकांच्या रोषाचा सामना आरोग्य कर्मचाऱ्यांना करावा लागत आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोविशिल्डचे ३ लाख २३ हजार ७३० तर कोव्हॅक्सिनच्या ९६ हजार ४४० असे एकूण ४ लाख २० हजार १७० डोस उपलब्ध झाले आहेत. १० मेपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ७२ हजार ५०२ जणांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. त्यात पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ३ लाख २२ हजार ३१७ एवढी असून दुसरा डोस ५० हजार १८५ जणांनी घेतला आहे. आता लसीकरणाचा वेग वाढविण्यात आला आहे; परंतु त्या प्रमाणात लसींचा पुरवठा होत नसल्याने हिरमोड होत आहे.
८९ सेंटर्स सुरू
जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध नसल्यामुळे यापूर्वी सुरू करण्यात आलेले अनेक केंद्रे बंद करण्यात आली होती. आता काही प्रमाणात का होईना लस उपलब्ध होत आहे. त्यामुळे काही केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. नांदेड शहरात सहा, सर्व उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये १६ आणि ६७ प्राथमिक आरोग्य केंद्रांत ही लस देण्यात येणार आहे. लसीचा साठा आणखी उपलब्ध झाल्यानंतर केंद्रे वाढणार आहेत.
१८ पेक्षा जास्त वयाचे इथे, दुसरा डोसवाले तिथे
१८ वर्षांपुढील तरुणांना पहिला डोस आणि ४५ च्या पुढच्यांना दुसरा डोस सध्या देण्यात येत आहे. या दोघांच्या लसीकरणासाठी प्रत्येक ठिकाणी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी गेल्यानंतर आरोग्य कर्मचारी यांच्याकडून पहिला की दुसरा डोस अशी विचारणा केली जाते. त्यानंतर संबंधित कक्षात जाण्याच्या सूचना देण्यात येतात. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
लसीकरण दहा वाजेपासून, लाइन सकाळी सात वाजेपासूनच
लसीकरणासाठी आता चांगला प्रतिसाद मिळत आहे. लसीकरणासाठी सकाळपासूनच नागरिक रांगेत लागत आहेत; परंतु ही रांग लावताना सोशल डिस्स्टन्सिंगचे पालन केले जात नाही. त्यातच या ठिकाणी गर्दी नियंत्रणासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही. बसायलाही जागा नाही. त्यामुळे उन्हातच कित्येक तास लसीकरणासाठी थांबावे लागत आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.