'संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांना भेटण्याचा प्रयत्न केला, पण...', पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 22:00 IST2025-01-20T21:56:35+5:302025-01-20T22:00:09+5:30
Pankaja Munde on Santosh Deshmukh Murder Case: 'पालकमंत्रिपदावरुन अजिबात नाराज नाही. बीड माझाच आहे, आता जालन्याची सेवा करण्याची संधी मिळाली, त्यात आनंद आहे.'

'संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांना भेटण्याचा प्रयत्न केला, पण...', पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या
Pankaja Munde on Santosh Deshmukh Murder Case: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन अनेक दिवस झाले, तरीदेखील भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी अद्याप देशमुख कुटुंबाची भेट का घेतली नाही? असा प्रश्न सातत्याने विचारला जातोय. आता या प्रश्नाचे स्वतः पंकजा मुंडे यांनी उत्तर दिले आहे. 'मी देशमुख कुटुंबीयांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण सध्याची परिस्थिती पाहता, त्यांनीच मला न भेटण्याची विनंती केली,' अशी माहिती पंकजा मुंडे यांनी दिली आहे.
राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे श्री रेणुका मातेचे दर्शन घेतले. यावेळी मीडियाशी संवाद साधताना संतोष देशमुख प्रकरणासह पालकमंत्रिपदाबाबत महत्वाचे भाष्य केले. त्या म्हणाल्या की, 'मी देशमुख कुटुंबीयांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांनीच मला विनंती केली की, परिस्थिती चांगली आहे, तुम्ही येऊ नका. त्यांची परवानगी घेऊन जाईल, असे मी आधीच जाहीर केले आहे.'
'माझ्या जाण्यापेक्षा, माझ्या जाण्याच्या आधी न्याय तिथे गेला पाहिजे. मी तिथे जाऊव संवेदना व्यक्त करणे, हा माझा वैयक्तिक विषय, त्याची जगासमोर प्रगटीकरण करण्याची आवश्यकता नाही. देशमुख कुटुंबीयांनाही माहिती आहे, माझ्या मनात त्यांच्याविषयी सहानुभूती आहे. कोणी कोणाला मारले त्याविषयी काय माझ्या मनात काडीहीची सहानुभूती नसणार. त्याच्याबद्दल प्रश्नचिन्ह कशासाठी? असेही पंकजा मुंडेंनी यावेळी स्पष्ट केले.
बीडचे पालकत्व मिळाले असते तर...
पालकमंत्री पदाबाबत पंकजा मुंडे म्हणाल्या, 'मी कुठलीही चॉईस देण्याचे कारण नाही. माझ्या राजकीय आयुष्यात मी एक टर्म मंत्री राहिले, तेव्हा मी बीडची पालकमंत्री होते. आता जे पद दिले, ते मी आनंदाने स्वीकारले. मला पत्रकाराने विचारले की, तुम्हाला बीडचे पालकमंत्रिपद दिले नाही. तेव्हा मी म्हणाले, बीडचे पालकमंत्रिपद दिल असते, तर आनंदच झाला असता. मात्र, आता जालन्याचे पालकत्व मिळाले आहे, त्याचाही आनंद आहे. मी अजिबात नाराज नाही. जालन्यात जल्लोष चालू आहे, लोक माझे स्वागत करत आहेत. जालण्यासाठी चांगले करण्याची संधी मला मिळाली आहे.'
मुंडे बहीण-भावाला बीडचे पालकमंत्रिपद दिले नाही, यामागे षडयंत्र वाटते का? असे विचारला असता पंकजा म्हणाल्या, 'मी असे काही मानत नाही. एकूणच पुढची परिस्थिती पाहता पालकमंत्रिपद अजितदादांनी घ्यावे, असे मी फार पूर्वी म्हणाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा अजितदादा, यापैकी कोणीही नेतृत्व स्वीकारले, तर मी स्वागतच करणार, असे म्हटले होते. रेणुका मातेच्या दारात आहे. मला अजिबात वाटले नाही की, हा जिल्हा की तो जिल्हा. बीड माझाच आहे, बीडसाठी मी काम करणारच आहे. आतापर्यंत जो पक्षाने आदेश दिला, तो मान्य केला. प्रेम करणारे लोक जालन्यातदेखील आहेत. मी अजिबात अजिबात नाही, अशा बातम्या लावणं बंद करा,' असंही पंकजा मुंडेंनी स्पष्ट केले.