बाप रे...वर्गात निघाला साप !!!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 01:02 PM2017-08-17T13:02:59+5:302017-08-17T13:03:48+5:30
ऑनलाईन लोकमत नांदेड, दि. १७ : धर्माबाद तालुक्यातील जि. प. प्रा.शाळा सालेगाव येथील वर्गात तास सुरु असतानाच साप निघाल्याने ...
ऑनलाईन लोकमत
नांदेड, दि. १७ : धर्माबाद तालुक्यातील जि. प. प्रा.शाळा सालेगाव येथील वर्गात तास सुरु असतानाच साप निघाल्याने विद्यार्थी व शिक्षकाची भीतीने चांगलीच तारांबळ उडाली. शेवटी सर्प मित्रांनी या सापाला पकडल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास घेतला.
सविस्तर बातमी अशी की, धर्माबाद तालुक्यातील जि. प. प्रा. शाळा सालेगाव येथील सातवीच्या वर्गात नित्याप्रमाणे तास सुरु होते. वर्गात गोजे सर विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यात मग्न होते याच दरम्यान सरांना पायाजवळ काहीतरी लागल्याची जाणीव झाली. खाली पाहिले तर एक मोठा साप त्यांच्या पायाजवळ घुटमळत होता. प्रसंगावधान राखून गोजे सरांनी न घाबरता सापाला विद्यार्थ्यांकड़े येऊ न देता त्यास हुसकावले. सापाने तेथून दूर जात वर्गातच एका लाकडी पेटीमागे दबा धरला.
याची माहिती मुख्याध्यापक लोकडे यांना समजताच त्यांनी लागलीच नांदेड येथील हेल्पिंग हैंड्स वाइल्डलाइफ वेलफेयर सोसाइटीचे सर्पमित्र क्रांती बुद्धेवार व ईलियास शेख यांना याची माहिती दिली. सर्पमित्रांनी वेळ न दवडता तात्काळ घटनास्थळी जाऊन त्या सापास जेरबंद केले. यानंतर त्यांनी पकडलेल्या सापाबद्दल माहिती देताना हा साप 'तस्कर' या जातीचा असून तो बिनविषारी असल्याचे सांगितले. यासोबतच त्याने यावेळी शिकार केली होती व त्याची लांबी ४ फुट असल्याचे सांगीतले. सर्पमित्रांच्या या कामगिरीबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व गावकरी, सर्पमित्र अतुल बागडे, शिक्षण विस्तार अधिकारी कमटलवार व गटशिक्षणाधिकारी डॉ.दत्तात्रय मठपती यांनी त्यांचे स्वागत केले.