सांगा मायबाप जगावं कस ? मुलांप्रमाणे जोपासलेली पपईची बाग वादळाच्या तडाख्याने भुईसपाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 06:21 PM2021-03-19T18:21:45+5:302021-03-19T18:22:28+5:30
मनाठा येथील काही शेतकऱ्यांनी हटके प्रयोग करत शेतात पपईची लागवड केली.
हदगाव : अचानक वातावरणात बदल झाल्याने मनाठा येथे सोसाट्याचे वादळवारे वाहू लागले.यामुळे अनेकांची धावपळ उडाली. मात्र याचा मोठा फटका शेतीला बसला आहे. शेतकऱ्याने मुलांप्रमाणे जोपासलेली पपईची बाग पाच मिनिटांच्या वादळाने भुईसपाट झाल्याची घटना गुरुवारी ( दि. १८ ) सायंकाळी घडली. निसर्गाच्या या फटक्याने शेतकरी हतबल झाला आहे.
मनाठा येथील काही शेतकऱ्यांनी हटके प्रयोग करत शेतात पपईची लागवड केली. श्रीराम सिताराम राठोड यांची गट क्रमांक ३४१ मध्ये दोन हैक्टर जमीन आहे. संयुक्त कुटुंब असल्याने १३ लोकांचा उदरनिर्वाह शेतीवरच आहे. पारंपारिक पीक सोडून त्यांनी मागील वर्षी मार्चमध्ये शेतीत काहीसा वेगळा प्रयोग केला. बंगरुळ येथून त्यांनी ७०० पपईची रोपे आणून १ एकर शेतात लावली. पपई येईपर्यंत त्यांनी यावर ४० ते ५० हजार रुपये खर्च केले. दिवाळीपासून त्यांनी फळांची विक्री त्यांनी सुरू केली. गावात फिरुन आठवडी बाजारात ते पपई विकु लागले. एका झाडाला ३० ते ४० फळे लागली. यातून प्रती झाड ७०० -८०० रुपये मिळण्याचा त्यांचा अंदाज होता.
गुरुवारी सायंकाळी राठोड कुटुंब शेतात जेवायला बसण्याच्या तयारीत होते. यावेळी अचानक वातावरण बदले आणि वादळ सुरु झाले. पुढच्या ५ ते १० मिनिटांमध्ये पपईची ३०० झाडांची संपूर्ण बाग कोलमडून पडली. मुलाप्रमाणे जोपासना केलेली झाडे उन्मळून पडत असतानाही निसर्गापुढे शेतकरी हतबल होता. राठोड कुटुंब तसेच ताटावरुन उठले. उन्मळून पडत असलेल्या बागेकडे पाहत त्यांच्या डोळ्यात पाणी तरारळे. दरम्यान, याच बागेची जोपासना करताना राठोड यांच्या मुलाला विजेचा धक्क्का बसला होता. कर्ज काढून उपचार करत राठोड यांनी त्याला वाचवले. पपईच्या विक्रीतून कर्ज फेडू असे त्यांचे नियोजन होते. मात्र, आता वादळाने सारेच नष्ट केल्याने कर्ज कसे फिटणार या विवंचनेत राठोड कुटुंबीय आहेत.