सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही फी देण्यास पालकांचा नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:18 AM2021-02-13T04:18:12+5:302021-02-13T04:18:12+5:30
नांदेड : कोरोनाच्या संकटात शाळा बंद असल्या तरीही पूर्ण फी शाळेला भरण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे; परंतु कोरोनामुळे ...
नांदेड : कोरोनाच्या संकटात शाळा बंद असल्या तरीही पूर्ण फी शाळेला भरण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे; परंतु कोरोनामुळे संकटात असलेल्या बहुतांशी पालकांनी फी भरण्यासाठी नकार दिला आहे. अशा परिस्थितीत नांदेड जिल्ह्यातील मेंढला, ता. अर्धापूर येथील निर्मल विद्यालय प्राथमिक ते उच्च माध्यमिक आणि निर्मल स्कूल इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांना २०२०- २१ या वर्षात फीमध्ये ९० टक्के सवलत देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
कोरोनामुळे देशात आर्थिक आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. हाताला काम नसल्यामुळे जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा बिकट परिस्थितीत विद्यार्थ्यांचे हित व पालकांची परिस्थिती लक्षात घेऊन निर्मल विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष राजेश्वर पालीमकर यांनी सर्वच विद्यार्थ्यांची पहिली ते दहावीपर्यंत संपूर्ण वर्षाची ९० टक्के फी माफ आणि गरीब विद्यार्थ्यांची पूर्ण फी माफ करून समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. पूर्ण राज्यात आज शाळेकडून पूर्ण फी वसूल करण्यासाठी सक्ती केली जात असतानाच निर्मल विद्यालयाने विद्यार्थ्यांची ९० टक्के फी माफ करून पूर्ण राज्यातील शिक्षण क्षेत्रात एक सामाजिक आदर्श घालून दिला आहे.
शाळा म्हणजे फक्त पैसा कमविण्याचे साधन नसून संस्कारक्षम पिढी घडविण्याची मंदिरे आहेत. या मंदिराबद्दल चुकीचा संदेश जाऊन गोरगरीब पालकांच्या मनात शाळेबद्दल तिरस्कार निर्माण होऊ नये, तर आदरच राहावा, या उदात्त भावनेतून काम करणाऱ्या निर्मल विद्यालयाचा हा आदर्श राज्यातीलच नव्हे, तर देशातील शिक्षण संस्थाचालकांनी घेतल्यास शिक्षण क्षेत्राबद्दल जनतेच्या मनातील विचारही निश्चितच बदलेल. त्यांच्या या निर्णयाचे कौतुक होत असून, विचारवंत प्रा. डॉ अनंत राऊत, मनोहर बंडेवार, भीमराव हत्तीआंबिरे, रामराव सूर्यवंशी, शिक्षणतज्ज्ञांनी व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांचे स्वागत केले.