हजारो कारसेवक श्रमदानात सहभागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 12:43 AM2019-07-10T00:43:28+5:302019-07-10T00:45:49+5:30
गोदावरी नदी प्रदूषणमुक्त व्हावी आणि तिचे सौंदर्यीकरण अबाधित रहावे, नदीत चांगला जलसंचय व्हावा तसेच नांदेडकरांच्या आरोग्यासह गोदावरीचे पावित्र्य राखण्यासाठी गुरुद्वारा लंगर साहिबचे कारसेवक मदतीला धाऊन आले आहेत.
नांदेड : गोदावरीनदी प्रदूषणमुक्त व्हावी आणि तिचे सौंदर्यीकरण अबाधित रहावे, नदीत चांगला जलसंचय व्हावा तसेच नांदेडकरांच्या आरोग्यासह गोदावरीचे पावित्र्य राखण्यासाठी गुरुद्वारा लंगर साहिबचे कारसेवक मदतीला धाऊन आले आहेत. गोवर्धनघाट ते नगीनाघाट या नदीपात्रात कायमस्वरूपी पाणी उपलब्धतेसाठी कारसेवकांचे हजारो हात राबत असून, यासाठी श्रमदानातून बांध घालण्याचे काम करण्यात आले.
नांदेडच्या वैभवात भर घालणाऱ्या गोदावरी नदीचे पावित्र्य धोक्यात आले आहे. शहरातील सांडपाणी नाल्याद्वारे काही ठिकाणी थेट नदीपात्रात सोडण्यात आल्याने भाविकांसह या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या अनुषंगाने सचखंड गुरुद्वारा हुजूर साहिबचे मुख्य जत्थेदार संत बाबा कुलवंतसिंघजी, गुरुद्वारा लंगर साहिबचे संत बाबा नरेंद्रसिंघजी व संत बाबा बलविंदरसिंघजी यांच्या मार्गदर्शनाखाली कारसेवकांनी नदीपात्र स्वच्छतेसह भाविक व नागरिकांच्या आरोग्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना श्रमदानाद्वारे सुरू केल्या आहेत.
नगीनाघाट ते गोवर्धनघाट या नदीपात्रामध्ये कायमस्वरूपी शुद्ध पाण्याच्या उपलब्धतेसाठी नदीपात्रात छोटा बांध घालण्यात येत आहे. नदीपात्रातील अनघड दगड बाजूला सारुन भाविकांसाठी गोदेचे शुद्ध पाणी कायमस्वरूपी उपलब्धतेसाठी शेकडो कारसेवकांचे हजारो हात राबत आहेत. नदीपात्रामधील जलपर्णी, सांडपाण्याचे व्यवस्थापन कारसेवकांमार्फत करण्यात येत आहे.
नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत गोदावरी शुद्धीकरण व स्वच्छतेसाठी वीस कोटी रुपयांची तरतूद केली आहे तर दुसरीकडे कारसेवकांच्या श्रमदानातूनच गोदावरीची स्वच्छता व शुद्धीकरणाचे काम हाती घेण्यात आल्याने नांदेडला आलेल्या भाविकांना गोदापात्रात शुद्ध पाणी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.