प्रवाशांची गैरसोय! आज राज्यराणी एक्स्प्रेस नाशिक रोड, इगतपुरी स्थानकावर थांबणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 07:04 PM2024-10-19T19:04:44+5:302024-10-19T19:05:55+5:30
ऐनवेळी रेल्वेच्या वेळापत्रकात आणि गाड्यांच्या मार्गात बदल होत असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
नांदेड : नांदेड-सीएसटीएम राज्यराणी एक्स्प्रेसच्या (१७६११) मार्गात बदल करण्यात आला आहे. १९ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता हुजूर साहिब नांदेड येथून सुटणारी ही गाडी नाशिक रोड व इगतपुरी स्थानकावर न थांबता थेट सीएसटीएम रेल्वेस्थानकाकडे प्रस्थान करेल. पहाटे ६:१२ मिनिटाला ही गाडी नाशिक रोड तर ७:१३ मिनिटाला ईगतपुरी रेल्वे स्थानकावर पाेहचते. काही कारणास्तव १९ ऑक्टोबर रोजी सुटणारी ही रेल्वे या दोन्ही रेल्वे स्थानकावर थांबणार नाही. दररोज रात्री ८ वाजता सुटणारी नांदेड-सीएसटीएम राज्यराणी एक्स्प्रेस दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता सीएसटीएम स्थानकावर पोहचते. या दरम्यान, १५ स्थानकांवर गाडीचा थांबा आहे. मात्र आज सुटणारी गाडी नाशिक आणि ईगतपुरी स्थानकावर थांबणार नाही, असे दक्षिण मध्य रेल्वे विभागाने सूूचित केले आहे.
नरसापूर-नगरसोल एक्स्प्रेसचे जुनेच वेळापत्रक
गाडी क्रमांक (१७२३१) नरसापूर-नगरसोल एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात १८ ऑक्टोबरपासून बदल करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला होता. परंतु हा निर्णय रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे ही एक्स्प्रेस आपल्या जून्याच वेळापत्रकानुसार धावेल, यामध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही, असे रेल्वे विभागाने कळविले. तेलंगण राज्यात असलेले नरसापूरहून ही ट्रेन प्रत्येक शुक्रवारी व रविवारी सकाळी ११:१५ वाजता स्थानकावरून सुटते. दुसऱ्या दिवशी सकाळी ९:४५ वाजता ही गाडी नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील नगरसोल स्थानकावर पोहचते. २५ स्थानकांवर ही गाडी थांबते. पहाटे ३:०५ मिनिटाला नांदेड स्थानकावर ही गाडी पाेहचते.
प्रवाशांची गैरसोय
आदिलाबाद-नांदेड-आदिलाबाद इंटरसिटी एक्स्प्रेस (१७४०९-१७४१०) १८ ऑक्टोबर रोजी मुदखेड-नांदेड-मुदखेडदरम्यान अंशत: रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली. ऐनवेळी रेल्वेच्या वेळापत्रकात आणि गाड्यांच्या मार्गात बदल होत असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.