प्रवाशांची रेल्वेपेक्षा बसला पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:22 AM2021-06-09T04:22:51+5:302021-06-09T04:22:51+5:30
दरम्यान, नांदेड विभागातून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यात आरक्षणाशिवाय प्रवास करता येत नसल्यानेही प्रवाशांकडून रेल्वे प्रवासाकडे पाठ ...
दरम्यान, नांदेड विभागातून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यात आरक्षणाशिवाय प्रवास करता येत नसल्यानेही प्रवाशांकडून रेल्वे प्रवासाकडे पाठ फिरविली जात आहे. मागील काही दिवसांत प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याने १४ रेल्वेगाड्या बंद करण्यात आल्या आहेत, तर आजघडीला ६० रेल्वे धावत आहेत. कोरोनापूर्वी १४० हून अधिक गाड्या दररोज धावत होत्या. आरक्षणाशिवाय प्रवासास मुभा तसेच पॅसेंजर गाड्या सोडण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.
मुंबईकडे धावणाऱ्या रेल्वेनाही मिळेना प्रतिसाद
नांदेड विभागातून मुंबईकडे धावणाऱ्या रेल्वेगाड्यांनाही प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नाही. ठराविक गाड्यांनाच प्रवासी मिळत आहेत. कोरोनापूर्वी १४० गाड्या सोडल्या जात होत्या. परंतु, आजघडीला ७४ गाड्यांना विशेष गाड्या म्हणून कोरोना काळात चालविण्यात येत होते. परंतु, त्यातही पनवेल, औरंगाबाद, अदिलाबाद, श्री साईनगर शिर्डी, रेणीगुंठा, परभणी आदी गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
बसने नांदेड-लातूर प्रवासाला प्रवाशांची पसंती
नांदेड ते लातूर या मार्गावर सर्वाधिक बसेस धावत आहेत. परंतु, इतर मार्गावर अपेक्षित प्रवासी मिळत नाहीत. दरम्यान, नांदेड आगारातून लांब पल्ल्यासाठी तसेच जिल्ह्याबाहेर बसेस सोडण्यासाठी सोमवारपासून प्रारंभ करण्यात आला आहे. त्याचबरोबर बसेसचे सॅनिटायझेशन करण्यात येत असून, विनामास्क करणाऱ्या प्रवाशांना बसमध्ये चढू दिले जात नाही.
आपण नियमांचे पालन केले, तरी इतर प्रवाशांकडून नियम पाळले जातील की नाही, याबाबत शंका असल्याने खासगी वाहनानेच प्रवास करण्यावर भर दिला जात आहे. - गणेश सूर्यवंशी, प्रवासी
बसमध्ये नियमांचे पालन करा म्हणून सूचना आहेत. परंतु, अनेक प्रवासी बसमध्ये चढल्यानंतर प्रवासात मास्कचा वापर करत नाहीत. त्यामुळे अशा प्रवाशांना दंड लावण्याचे अधिकार वाहकांना दिले पाहिजे. - विजया पवार, प्रवासी.
रेल्वेमध्ये आरक्षणाशिवाय प्रवास करू दिला जात नाही. त्यामुळे आरक्षणाच्या कटकटीशिवाय प्रवास म्हणून बसच्या प्रवासास पसंती देणाऱ्यांची संख्या अधिक आहे. पॅसेंजर गाड्या सुरू करण्याची गरज आहे. - अरुण कदम, प्रवासी.
रेल्वेगाड्यांमध्ये कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. परंतु, मुंबई, पुणे येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची भिती वाटत आहे. त्यात लहान मुलांना संसर्ग होण्याचा अधिक धोका असल्याने खासगी वाहनांना पसंती देत आहोत. - विनोद जावळे, प्रवासी.
प्रवाशांचा प्रतिसाद कमी झाल्याने नांदेड विभागातील काही रेल्वेगाड्या तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आल्या आहेत. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या सर्वच नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. - राजेश शिंदे, डीआरएम कार्यालय.
लॉकडाऊन काळात १०० बसेस सुरू होत्या. त्यात सोमवारपासून १५० बसेस वाढविण्यात आल्या आहेत. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असून, पुढील काही दिवसात आणखी वाढेल. शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार विनामास्क प्रवाशांना बसू दिले जात नाही. तसेच बसेसचे नियमितपणे सॅनिटायझेशन केले जात आहे. - अशोक पन्हाळकर, विभाग नियंत्रक, नांदेड