पोटा यात्रेत जखमी मल्लाचा अखेर मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 12:48 AM2018-12-31T00:48:08+5:302018-12-31T00:48:22+5:30
कुस्ती चालू असताना मानेवर कुचकल्याने एक युवा पहेलवान बेशुद्ध पडला़ त्यास प्रथम भोकर व नंतर नांदेडला हलविण्यात आले होते़ मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला़
हिमायतनगर : तालुक्यातील पोटा येथे दत्तात्रेय देवस्थान येथे दरवर्षी यात्रा भरते़ यंदा कुस्तीच्या फडामध्ये १८ वयोगटातील कुस्ती चालू असताना मानेवर कुचकल्याने एक युवा पहेलवान बेशुद्ध पडला़ त्यास प्रथम भोकर व नंतर नांदेडला हलविण्यात आले होते़ मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला़ या घटनेमुळे यात्रेला गालबोट लागले आहे.
बुधवारी पालखी मिरवणुकीने झाली. तीन दिवसांच्या यात्रेतील दुसऱ्या दिवशी होणाºया कुस्त्यांच्या फडात जिल्ह्यातील शेकडो पहेलवांनानी गाजविला़
दरम्यान, २७ रोजी गुरुवारी हिमायतनगर तालुक्यातील मंगरूळ येथील अनिल माधव राजेवाड (वय १८) हा पहेलवान प्रतिस्पर्धी पहेलवानासोबत कुस्ती खेळताना गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे त्यास तात्काळ उपचारासाठी भोकर येथील प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची प्रकृती गंभीर असल्याने तेथून नांदेडला उपचारासाठी हलविण्यात आले होते. दरम्यान, २९ रोजी शनिवारी दुपारी एक वाजता त्या युवा पहेलवानाची प्राणज्योत मालवली.
रोजमजुरी करून आपल्या आई वडिलांसह लहान भावाचा उदरनिर्वाह करणारा हा घरातील कर्ता युवक होता. हा युवक कुस्तींच्या फडात गंभीर जखमी झाल्याचे कळताच गावातील लोकांनी निधी जमा करून त्यास रुग्णालयात भरती केले होते. परंतु नियतीला हे पसंत आले नाही. घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे़