नांदेडमध्ये रुग्णांना नातेवाईकांचाच आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 12:59 AM2018-08-09T00:59:05+5:302018-08-09T00:59:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : सातवा वेतन आयोग लागू करावा यासह इतर मागण्यांसाठी राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी तीन दिवशीय संप पुकारला आहे़ या संपात विष्णूपुरी येथील डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील जवळपास ८०० कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आहे़ त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना वॉर्डात दाखल करण्यासाठी नातेवाईकांना मोठी कसरत करावी लागत आहे़ परिचारिकाही संपात असल्यामुळे रुग्णांचे मोठे हाल होत आहेत़
विष्णूपुरी येथील रुग्णालयात असलेल्या बाह्यरुग्ण विभागात दिवसाकाठी जवळपास दोन हजारांवर रुग्ण येतात़ तर आंतररुग्ण विभागात दाखल होणा-या रुग्णांची संख्याही मोठी आहे़ या ठिकाणी यवतमाळ, परभणी, हिंगोलीसह शेजारील तेलंगणातूनही मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी येतात़ रुग्णसेवेची सर्व भिस्त ही परिचारिका, चतुर्थश्रेणी कर्मचारी आणि डॉक्टरांवरच असते़ परंतु, गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या संपात जवळपास ३५० परिचारिका, तांत्रिक विभागातील १४० कर्मचारी, लिपीकवर्गीय १२० आणि चतुर्थश्रेणीच्या १२० अशा एकूण ८०० कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे़ त्यामुळे या ठिकाणी असलेल्या सर्व वॉर्डामध्ये सकाळी अन् सायंकाळी राऊंडवर येणा-या डॉक्टरांची मोठी गैरसोय होत आहे़ कोणत्या रुग्णाला कोणत्या वेळी औषध, सलाईन किंवा इंजेक्शन द्यायचे याबाबत डॉक्टरही अनभिज्ञ आहेत़ त्यामुळे रुग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे़ या ठिकाणी येणाºया रुग्णांना स्ट्रेचरवरुन वॉर्डात नेले जाते़ परंतु, स्ट्रेचर नेण्यासाठीही कर्मचारी नसल्यामुळे नातेवाईकांना अत्यवस्थ रुग्णांना अक्षरश: उचलूनच वॉर्ड गाठावा लागत आहे़ परिचारिका अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षाला असलेल्या विद्यार्थिनींची प्रत्येक वॉर्डात नियुक्ती करण्यात आली आहे़ त्यामुळे दिलासा मिळाला आहे़
---
संपाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होवू नये म्हणून परिचारिका अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षाला असलेल्या विद्यार्थिनींची प्रत्येक वॉर्डात नियुक्ती करण्यात आली आहे़ निवासी डॉक्टर, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक यांच्यावरही वॉर्डनिहाय जबाबदारी सोपविण्यात आली आहे़ त्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला नाही़ महाविद्यालय व रुग्णालय प्रशासन रुग्णसेवेबाबत आवश्यक ती सर्व खबरदारी घेत असल्याची प्रतिक्रिया वैद्यकीय अधीक्षक वाय़एच़ चव्हाण यांनी दिली़