राजकारणात गुरु मानायची पद्धत आता संपुष्टात-गिरीष गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 12:39 AM2019-02-27T00:39:45+5:302019-02-27T00:41:36+5:30

संगीत क्षेत्रात गुरु-शिष्यांची परंपरा कायम असली तरी राजकारणात मात्र अलीकडे गुरु मानायची पद्धत संपली आहे. त्याचा फटका राजकरण्यांना बसत आहेच. अशा काळात सकारात्मक, विकासाचे राजकारण करणाऱ्या शंकरराव चव्हाणांची आठवण प्रकर्षाने होते, असे प्रतिपादन वनराई फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी आ. डॉ. गिरीष गांधी यांनी केले.

Patriarch of Politics in Politics Now Withdrawal- Girish Gandhi | राजकारणात गुरु मानायची पद्धत आता संपुष्टात-गिरीष गांधी

राजकारणात गुरु मानायची पद्धत आता संपुष्टात-गिरीष गांधी

Next
ठळक मुद्देसंगीत शंकर दरबार महामहोपाध्याय कमलाकर परळीकर यांना संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल जीवन गौरव पुरस्कार प्रदान

नांदेड : संगीत क्षेत्रात गुरु-शिष्यांची परंपरा कायम असली तरी राजकारणात मात्र अलीकडे गुरु मानायची पद्धत संपली आहे. त्याचा फटका राजकरण्यांना बसत आहेच. अशा काळात सकारात्मक, विकासाचे राजकारण करणाऱ्या शंकरराव चव्हाणांची आठवण प्रकर्षाने होते, असे प्रतिपादन वनराई फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी आ. डॉ. गिरीष गांधी यांनी केले.
डॉ. शंकरराव चव्हाण व कुसुमताई चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित संगीत शंकर दरबारचे उद्घाटन २६ फेब्रुवारी रोजी पं. मुकुल शिवपूत्र यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण होते. यावेळी महामहोपाध्याय डॉ. कमलाकरराव परळीकर, कुलगुरु डॉ. उद्धवराव भोसले, माजीमंत्री वसंतराव पुरके, भाई जगताप, पुष्पाताई पाटील, किशोरअप्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
याच कार्यक्रमात महामहोपाध्याय डॉ. कमलाकरराव परळीकर यांना संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्कार देवून गौरविण्यात आले. या सोहळ्यात बोलताना डॉ. गांधी यांनी आध्यात्मिक पार्श्वभूमी असलेल्या शंकरराव चव्हाण यांनी पहिल्यांदा संयुक्त महाराष्टला विकासाचे राजकारण काय असते, हे दाखवून दिल्याचे सांगितले. यशवंतराव चव्हाणांच्या मंत्रिमंडळात महसूल खात्याचे उपमंत्री असताना खुद्द पंतप्रधानांचे आदेश काँग्रेस पक्षाच्या ध्येयधोरणाशी कसे विसंगत आहेत, हे दर्शविण्यासाठी शंकरराव चव्हाण हे थेट पंतप्रधान पंडित नेहरु यांच्यापर्यंत पोहोचले होते. पंडित नेहरु हे गांधींना आपले गुरु मानत तर शंकरराव चव्हाण यांनी स्वामी रामानंद तीर्थ हे आपले गुरु असल्याचे सातत्याने सांगितले. पण आज राजकारणात गुरु मानण्याची पद्धत संपुष्टात आल्याचे गांधी म्हणाले. संगीत शंकर दरबारबद्दल बोलताना डॉ. गांधी यांनी शंकररावांची रसिकता या महोत्सवातून पुढे जोपासली जात असल्याचे ते म्हणाले.
जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या महामहोपाध्याय कमलाकरराव परळीकर यांनी या पुरस्काराने आपली जबाबदारी वाढल्याचे मनोगतात सांगितले. याच कार्यक्रमात धनंजय जोशी, अभिजीत अपस्तंभ, हरिदास उमाटे यांचाही गौरव करण्यात आला.
एस. आकाश (बासरी), यज्ञेश रायकर (व्हायोलीन) व ईशान घोष (तबला) यांनी जुगलबंदीतून विविध राग सादर केले. संगीत शंकर दरबारमध्ये मंगळवारी त्रिभुक्ती ही जुगलबंदी रसिकांना मंत्रमुग्ध करुन गेली. तर पं, मुकुल शिवपूत्र यांनीही शास्त्रीय गायन सादर केले. प्रारंभी त्यांनी राग ‘गौरी बसंत’सह अनेक राग सादर केले.
कार्यक्रमास महापौर शीलाताई भवरे, सभागृह नेता विरेंद्रसिंघ गाडीवाले, काँग्रेस जिल्हाध्यक्ष गोविंद शिंदे नागेलीकर, नगरसेवक अमितसिंह तेहरा, दुष्यंत सोनाळे, संजय जोशी आदींची उपस्थिती होती.
नांदेडकरांसाठी सांस्कृतिक मेजवानी-चव्हाण
संगीत शंकर दरबारला नांदेडकरांनी गेल्या १५ वर्षापासून दिलेली दाद वाखाणण्याजोगी असल्याचे खा. अशोकराव चव्हाण यांनी सांगितले. शंकरराव चव्हाण यांना प्रशासकीय कामात जसा रस होता तसाच सांस्कृतिक क्षेत्रातही विशेषत: शास्त्रीय संगीतात त्यांची आवड असल्याचे सांगितले. नांदेडकरांना या संगीत शंकर दरबार महोत्सवातून सांस्कृतिक मेजवानी मिळत असल्याचे ते म्हणाले. या महोत्सवात देशातील नामवंत कलावंतांनी आपली कला सादर केली आहे. यापुढेही अनेक दिग्गज या मंचावर उपस्थित राहतील. नांदेडचे कलावंत आज देशपातळीवर यश मिळवित आहेत. ही बाबही उल्लेखनीय आहे, असेही ते म्हणाले.

Web Title: Patriarch of Politics in Politics Now Withdrawal- Girish Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.