‘खंडणी दे, नाही तर गोळी घालू’; नांदेडमध्ये रिंदा गँग पुन्हा सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 01:23 PM2020-10-13T13:23:50+5:302020-10-13T13:27:54+5:30
Rinda gang reactivated in Nanded शहरात पुन्हा एकदा व्यापाऱ्यांना खंडणीसाठी धमकावणे सुरु
नांदेड : शहरात रिंदा गँग पुन्हा एकदा सक्रिय झाली असून ‘खंडणी दिली नाही तर गोळी घालू’ अशी धमकी एका व्यापाऱ्याला देण्यात आली आहे. या प्रकरणात वजिराबाद पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शहरात कुख्यात हरविंदरसिंह रिंदा याने काही महिन्यांपूर्वी प्रतिष्ठीत व्यापारी, डॉक्टर यांना जीवे मारण्याची धमकी देत लाखो रुपयांची खंडणी वसूल केली होती. या प्रकरणात पोलिसांनी रिंदा गँगचे ६० हून अधिक सदस्य पकडले होते. त्याचबरोबर मोक्का अंतर्गत अनेकांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर काही महिने शहरात शांतता होती. परंतु, आता पुन्हा एकदा व्यापाऱ्यांना खंडणीसाठी धमकावणे सुरु झाले आहे.
१० आॅक्टोबर रोजी इंदरजितसिंह यांच्या कापड दुकानासमोर दिलबागसिंह लखविंदरसिंह रंधवा हे बोलत थांबले होते. त्याचवेळी त्यांच्याजवळ सोनू गील आणि लालो हे दोघे जण आले. सोनू गील याने दिलबागसिंह यांची कॉलर पकडून रिंधाच्या नावाने खंडणी मागितली. यावेळी दिलबागसिंह याने त्याच्या तावडीतून आपली सुटका करुन घेतली. त्यामुळे चिडलेल्या लालो याने खंडणी न दिल्यास गोळी घालण्याची धमकी दिली. दिलबागसिंह यांच्या तक्रारीवरुन वजिराबाद ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.