उद्याच्या पेपरसाठी आजच पैसे द्या;स्वारातीम विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेची व्हाॅट्सॲपवर उत्तरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2022 06:01 PM2022-02-14T18:01:54+5:302022-02-14T18:06:15+5:30
उद्याचा पेपर हवा असेल तर आजच पैसे जमा करावेत, असे आवाहन ग्रुपमध्ये केले आहे.
नांदेड : राज्यात विविध परीक्षांमध्ये झालेले घोटाळे चर्चेत असतानाच नांदेडच्या स्वारातीम विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेतही घोटाळा झाल्याची माहिती समोर येत आहे. व्हॉट्सॲप ग्रूपवर उत्तरपत्रिका पाठवून गुगल पे, फोन पेच्या माध्यमातून पैसे उकळण्यात आल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणने आहे. मात्र हे सराव परीक्षेतील प्रश्न असल्याचे विद्यापीठाचे म्हणने आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने ८ फेब्रुवारीपासून सुरू झाल्या आहेत. यामध्ये बहुतांश विद्यार्थी ऑनलाइन परीक्षेला प्राधान्य देत आहेत. त्यातच ऑनलाइन परीक्षेसाठीच्या प्रश्नांची उत्तरे उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवत काही व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून पैसे घेतले जात आहेत. महाविद्यालय, विद्यापीठाच्या नावेदेखील ग्रुप बनवून ग्रुपच्या माध्यमातून आर्थिक अपहार केल्याचे स्पष्ट दिसत आहे. विद्यार्थ्यांनी गुगल, फोन पे च्या माध्यमातून पैसे टाकल्याचे स्क्रीन शॉट सदर ग्रुपवर टाकलेले दिसत आहेत. त्याचबरोबर सदर प्राध्यापकाने प्रश्नपत्रिकाही टाकलेली आहे. मात्र, सदर प्रश्नपत्रिका केवळ सरावासाठी प्राध्यापकांकडून घेतल्या असल्याच्या या ग्रुपमधील काही विद्यार्थ्यांनी सांगितले.
संबंधित प्राध्यापकाने ग्रुपमधील सर्वांनी पैसे टाकण्यासाठी आवाहन केले आहे. त्यात ऑनलाइन सुविधा नसलेल्या विद्यार्थ्यांना ऑफलाइन म्हणजेच ग्रुपमधील एका विद्यार्थ्याकडे तर मुलींसाठी एका मुलीकडे पैसे जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यात तशी माहिती देत त्यांनी आवाहन केले होते. त्याचबरोबर इतर कॉलेजमधून उत्तरपत्रिकेच्या संचासाठी ५०० रुपये प्रति विद्यार्थी दिले जात असल्याचेही सांगण्यात आले, असे ग्रुपमधील संवादावरून दिसत आहे.
उद्याचा पेपर हवा असेल तर आजच पैसे जमा करा
उद्याचा पेपर हवा असेल तर आजच पैसे जमा करावेत, असे आवाहन ग्रुपमध्ये केले आहे. जर सरावासाठी प्रश्नपत्रिका असत्या तर उद्याचा पेपर असा उल्लेख कसा? यातून ऑनलाइन परीक्षेत घोटाळा झाल्याचे दिसून येत आहे. हा ग्रुप तासिका तत्त्वावरील एका प्राध्यापकाचा आहे. परंतु, चौकशीनंतर निश्चितच विद्यापीठातील बडे मासेही गळाला लागतील, असे बोलले जात आहे.
ग्रुप ॲडमिनला बोलावले : परीक्षा विभाग
ऑनलाइन परीक्षेतील प्रश्न आणि उत्तरे देण्यासाठी व्हॉट्सॲप ग्रुप बनविल्याचे वृत्त आहे. ग्रुप ॲडमिन असलेल्या तासिका तत्त्वावरील प्राध्यापकास चौकशीसाठी सोमवारी विद्यापीठात बोलावले आहे. त्याची चौकशी केल्यानंतर सत्यता पुढे येईल.
- रवी सरोदे, परीक्षा नियंत्रक, स्वारातीम विद्यापीठ, नांदेड