नांदेडात प्लास्टिक बंदीचा भंग करणाऱ्या १९ व्यापा-यांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 12:47 AM2018-10-04T00:47:40+5:302018-10-04T00:48:01+5:30
महापालिकेने प्लास्टिक बंदी निर्णयाच्या अंमलबजावणीस पुन्हा एकदा नव्याने प्रारंभ केला असून शहरात बुधवारी वेगवेगळ्या भागात १९ व्यापा-यांना प्लास्टिक वापरल्याप्रकरणी ९५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : महापालिकेने प्लास्टिक बंदी निर्णयाच्या अंमलबजावणीस पुन्हा एकदा नव्याने प्रारंभ केला असून शहरात बुधवारी वेगवेगळ्या भागात १९ व्यापा-यांना प्लास्टिक वापरल्याप्रकरणी ९५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
प्लास्टिक बंदीचा निर्णय २३ जून रोजी राज्यभरात लागू झाल्यानंतर नांदेडमध्येही महापालिकेने मोठ्या कारवाया केल्या होत्या. कोट्यवधींचे प्लास्टिक जप्त केले. त्यानंतर शासनस्तरावर प्लास्टिक वापराबाबत काही घटकांना सूट दिल्यानंतर नांदेडमध्ये ही कारवाई थंडावली होती. त्यानंतर पुन्हा शुक्रवारपासून महापालिकेने शहरात प्लास्टिक विरोधी मोहीम हाती घेतली. प्लास्टिक वापरणाºया किराणा दुकानदारांना दंड ठोठावण्यात आला. प्रभाग १५, १७, १८ मध्ये ही कारवाई करण्यात आली होती.
बुधवारी पुन्हा महापालिकेने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांसमवेत शहरातील विविध भागात तपासणी मोहीम राबविली. शहरातील ५५ दुकानांची तपासणी बुधवारी केली.
त्यावेळी १९ व्यापा-यांकडे बंदी असलेले प्लास्टिक आढळले. त्यांच्याकडून ९५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
बुधवारी झालेल्या कारवाईत प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सहायक आयुक्त धपाळे यांच्यासह त्यांचे सहकारी तसेच महापालिकेचे सहायक आयुक्त गुलाम सादिक, क्षेत्रिय अधिकारी अविनाश अटकोरे, संजय जाधव, सुधीर इंगोले, शिवाजी डहाळे, डॉ. मिर्झा बेग, स्वच्छता निरीक्षक, महापालिकेचे पोलिस पथक, मनपा कर्मचारी सहभागी होते. बुधवारच्या कारवाईत १०० किलो कॅरिबॅगचा साठा पथकाने जप्त केला आहे. या कारवाई दरम्यान व्यापारी व मनपा पथकात वादही झाले. शहरवासियांनी बाजारात निघताना कापडी पिशवी घेवून निघावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
... नागरिकांवरही कारवाई
प्लास्टिक बंदी निर्णयाअंतर्गत प्लास्टिक वापरणाºया नागरिकांवरही दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार महापालिकेला प्रदान करण्यात आले आहेत. आतापर्यंत महापालिकेने प्लास्टिक वापरल्याप्रकरणी व्यापा-यांना दंड ठोठावला आहे. यापुढे आता शहरात ज्या नागरिकांकडे प्लास्टिक आढळेल, त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई करण्याचा ईशारा देण्यात आला आहे. महापालिकेकडून प्लास्टिक बंदीची कारवाई दररोज केली जाणार आहे. त्यात नागरिकांनी कापडी पिशवीचा वापर करावा अन्यथा दंडात्मक कार्यवाहीला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला आहे.