मालमत्ताधारकांना मिळणार शास्ती माफीचे गिफ्ट; महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत येणार ठराव
By शिवराज बिचेवार | Published: September 13, 2022 05:02 PM2022-09-13T17:02:05+5:302022-09-13T17:02:30+5:30
मनपाने आता थकबाकीवरील शास्ती माफ करण्यासाठी अभय योजना आणण्याचा विचार सुरू केला आहे.
नांदेड : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नागरिकांना मालमत्ता कर भरणेही अवघड होऊन बसले आहे. या पार्श्वभूमीवर मालमत्ताधारकांकडे असलेल्या थकबाकीवरील शास्ती माफीचे गिफ्ट महापालिकेकडून देण्यात येणार आहे. त्यासाठीचा ठराव बुधवारच्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात येणार आहे.
महापालिकेच्या तिजोरीत सध्या खडखडाट आहे. महापालिकेच्या उत्पन्नातून आजघडीला कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शनची रक्कम भागविणेही अवघड होऊन बसले आहे. त्यात सत्तांतर झाल्याने राज्य सरकारकडून येणाऱ्या निधीलाही ब्रेक बसला आहे. बीओटी तत्त्वावर मालमत्ता देऊन त्यापासून उत्पन्न मिळविण्याच्या प्रयत्नाही बरेच गौडबंगाल आहे. त्यामुळे त्याला स्थगिती देण्यात आली आहे. महापालिकेची सध्या सर्वच बाजूंनी काेंडी झाली आहे. त्यात गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे मालमत्ता कराची वसुली नगण्य आहे, तर दुसरीकडे यंदा अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
त्यामुळे अनेकांना मालमत्ता कर भरणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे थकबाकीचा आकडा वाढतच चालला आहे. त्याचा मनपाच्या उत्पन्नावरही परिणाम होत आहे. त्यामुळे मनपाने आता थकबाकीवरील शास्ती माफ करण्यासाठी अभय योजना आणण्याचा विचार सुरू केला आहे. त्यासाठी माजी महापौर अब्दुल सत्तार अब्दुल गफूर यांनी विषयपत्रिकेत हा विषय ठेवला आहे. बुधवारी होत असलेल्या सर्वसाधारण सभेत या विषयाला मान्यता मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.