कंधार तालुक्यातील ८ गावांतील प्रलंबित रस्ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:31 AM2020-12-14T04:31:48+5:302020-12-14T04:31:48+5:30
कंधार : तालुक्यातील बारूळ येथील मातंग व बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीचा रस्ता अनेक वर्षांपासून रखडला होता. १ हजारापेक्षा अधिक लोकसंख्या ...
कंधार : तालुक्यातील बारूळ येथील मातंग व बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीचा रस्ता अनेक वर्षांपासून रखडला होता. १ हजारापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या समाजाची प्रेत घेऊन जाताना होणारी हेळसांड थांबली आहे, तसेच इतर ७ गावांतील रस्ता व पाणंद रस्त्याचा प्रश्न निकाली काढण्यात महसूल विभागाला यश मिळाले आहे.
तालुक्यातील अनेक गावांत लहानशी कारणे, स्थानिक राजकारण, हेवेदावे, काहींची अडवणुकीची असलेली भूमिका, भाऊबंदकीत असलेली टोकाची भूमिका यामुळे रस्त्याचा प्रश्न गुंतागुंतीचा होत असतो. गावात हा प्रश्न मिटत नसतो. काही जण न्यायालयात प्रकरण दाखल करतात. त्यामुळे सामान्यांची मोठी अडचण होते. माणुसकी व संवेदनशीलता असलेले अधिकारी व माणसे यातून सामोपचाराने मार्ग काढतात, तसेच तहसीलदारांना असलेल्या अधिकाराचा उपयोग करून प्रलंबित रस्त्यांचा प्रश्र निकाली काढण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.
बारूळ येथील बौद्ध व मातंग समाजाला स्मशानभूमीला जाणाऱ्या रस्त्याची मोठी समस्या होती.
मामलेदार कोर्ट ॲक्ट १९०५ च्या पोटकलम ५ नुसार रस्त्याचा प्रश्न तहसीलदारांनी सोडवत दोन्ही समाजांना मोठा दिलासा दिला आहे. पावसाळ्यात मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करणे जोखमीचे होते. ऑक्टोबर २०२० मध्ये जटिल प्रश्न सुटला, तसेच एक पारंपरिक सुमारे १९६० पासूनचा पाणंद रस्त्याचा प्रश्न सुटल्याने शेकडो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
उस्माननगर येथील २ रस्त्यांचा प्रश्न सोडविण्यात आल्याने शेतकरी व नागरिकांना दिलासा मिळाला. दहीकळंबा येथील सुमारे १० कि.मी.पेक्षा जास्त, असा ४ ते ५ रस्त्यांचा प्रश्न सोडविण्यात आला. पानभोसी येथील ४०० ते ५०० मीटरचा रस्ता प्रश्न, पानशेवडी येथील दीड ते दोन कि.मी.चा रस्ता, कारतळा येथील १९७२ पासूनचा किचकट पाणंद रस्ता तयार करण्यात आला. रस्ता अडचणीमुळे शेतकरी, शेतमजूर, पशुधनाची होणारी फरपट थांबली. २ कि.मी.चा हा रस्ता पालकमंत्री पाणंद रस्त्यात मंजुरी आणून १ लाखातून करण्यात आला. सोमठाणा येथील रस्त्याच्या वादाने अडचण येत होती. हा प्रश्न सोडवून पालकमंत्री पाणंद रस्त्याचा प्रस्ताव दाखल करण्याची सूचना करण्यात आली, तसेच गुटेवाडी ते जयराम तांडा हा २ कि.मी.चा रस्ता पालकमंत्री पाणंद रस्त्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या सूचना व उपविभागीय अधिकारी पांडुरंग बोरगावकर, तत्कालीन तहसीलदार सखाराम मांडवगडे, नायब तहसीलदार व काही काळ प्रभारी तहसीलदार असलेले विजय चव्हाण, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या सहकार्याने, स्थानिक लोकप्रतिनिधी व विशेषतः नागरिकांच्या विधायक भूमिकेने रस्त्यांचा प्रश्न ३ महिन्यांत सुटण्यास मदत मिळाली.