'जनतेनं वीज बिलं भरू नयेत, 50 टक्के सवलतीचा निर्णय कुणी रद्द केला?'
By महेश गलांडे | Published: November 18, 2020 06:31 PM2020-11-18T18:31:32+5:302020-11-18T18:33:12+5:30
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील जनतेला वीज बिल न भरण्याचं आवाहन केलं आहे. तसेच, लॉकडाऊन काळातील विज बिलात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय कोणत्या मंत्र्याने रद्द केला, असा सवालही आंबेडकर यांनी विचारला आहे.
नांदेड - राज्यातील वीज ग्राहकांना ठाकरे सरकारने सक्तीने बिल भरण्याचा शॉक दिल्यानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. लोकांनी वीज वापरली असेल तर बिल भरावंच लागेल, वीजबिलात कुठलीही माफी अथवा सवलत नाही असं ऊर्जामंत्रीनितीन राऊत यांनी सांगितले. त्यामुळे वीजबिल माफीची अपेक्षा धरणाऱ्या सर्वसामान्यांना मोठा झटका बसला. ऊर्जामंत्र्यांच्या या विधानानंतर विरोधी पक्ष आणि इतर संघटनांनी सरकारविरुद्ध संताप व्यक्त केला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील जनतेला वीज बिल न भरण्याचं आवाहन केलं आहे. तसेच, लॉकडाऊन काळातील विज बिलात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय कोणत्या मंत्र्याने रद्द केला, असा सवालही आंबेडकर यांनी विचारला आहे. जनेतनं विज बिलं भरू नयेत, असे आवाहन करताना, विज बिल न भरल्यास 50 टक्के सवलत मिळेल, असा दावाही आंबेडकर यांनी केला. आंबेडकर यांनी नांदेड येथील पत्रकार परिषदेत बोलताना राज्यातील जनतेला बिलं न भरण्याचं सूचवलं आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी म्हणाले की, ऊर्जामंत्रीनितीन राऊत वारंवार सांगत होते, आम्ही काही ना काही मदत करू, दिवाळीला गोड बातमी देऊ, सक्तीची वसुली करा ही गोड बातमी? सरकारमधील मंत्री अशाप्रकारे बेजबाबदार विधान करत असतील तर सरकारवरचा आणि मंत्र्यावरचा सामान्य जनतेचा विश्वास उडेल, आम्ही वीज बिलं भरणार नाही, सक्तीची वसुली करून बघा, जशास तसं उत्तर देऊ, रस्त्यावर उतरू असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. तर, दुसरीकडे मनसेनंही विज बिलावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे.
मनसेही आक्रमक
'लॉकडाउनदरम्यान जनतेला आलेलं वाढीव वीजबिल माफ व्हावं यासाठी आम्ही अनेक आंदोलनं केली. काहीवेळा आमच्या कार्यकर्त्यांनी कायदाही हातात घेतला. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांनाही याबाबत पत्र लिहीलं. पण त्यावर अद्याप काहीच तोडगा निघालेला नाही. ऊर्जामंत्र्यांनी वीजबिल माफ होणार नाही असं जाहीर केलं. जर लोकांकडून बळजबरीनं वीजबिल घेतलं जाणार असेल तर तुमची गाठ मनसेशी आहे हे लक्षात ठेवा', असं अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.