फास लटकविलेल्याचे वाचले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 12:26 AM2019-05-03T00:26:57+5:302019-05-03T00:29:53+5:30
राज्यात दररोज आत्महत्येच्या घटना घडत आहेत़ त्या रोखण्यात अद्याप तरी शासनाला यश आले नाही़ परंतु नांदेडात माली पाटील चौकात झाडाला गळफास घेतलेल्या एका कामगाराचे काही तरुणांनी प्राण वाचविले़
नांदेड : राज्यात दररोज आत्महत्येच्या घटना घडत आहेत़ त्या रोखण्यात अद्याप तरी शासनाला यश आले नाही़ परंतु नांदेडात माली पाटील चौकात झाडाला गळफास घेतलेल्या एका कामगाराचे काही तरुणांनी प्राण वाचविले़ एकाने पाय उचलून धरले तर दुस-याने गळ्यातील फास सोडविला़ काही सेकंदाच्या या थरारात आत्महत्या करणा-या कामगाराचे मात्र प्राण वाचले़ ही घटना गुरुवारी दुपारी घडली़
गुरुवारी दुपारी माली पाटील चौक परिसरात विलास कोकाटे, कृष्णा शिंदे व मोहन कदम हे मित्र उभे होते़ त्याचवेळी त्यांना जवळच असलेल्या एका झाडाला एक व्यक्ती दोर टाकून गळफास घेतल्याचे आढळून आले़ त्यांनी आरडाओरड करीतच झाडाकडे धाव घेतली़ परंतु तोपर्यंत त्या व्यक्तीने गळ्यात दोर टाकून पाय मोकळे सोडले होते़ त्याचवेळी धावत आलेल्या विलास कोकाटे, कृष्णा शिंदे आणि मोहन कदम यातील एकाने त्यांचे पाय उचलून धरले़ तर दुस-याने त्यांच्या गळ्यातील फास काढला़ यावेळी आत्महत्येचा प्रयत्न करणारे राजू किसन गायकवाड (रा़दिग्रस ता़अर्धापूर) हे जोर जोरात फक्त दोन मिनिटे थांबा म्हणत होते़ परंतु या तरुणांनी अत्यंत चपळाईने त्यांच्या गळ्यातील दोर काढत त्यांना खाली ओढले़ काही सेकंदाच्या या थरारात गायकवाड यांचे प्राण वाचले़ परंतु खाली उतरवताच गायकवाड यांनी दोरीसकट पळ काढण्याचा प्रयत्न केला़ यावेळी तरुणांनी त्यांना धरुन ठेवले़ घटनास्थही श्याम कोकाटे व सत्यवान अंभोरे हेही दाखल झाले़ लगेच विमानतळ पोलिस ठाण्याला ही माहिती देण्यात आली़ पोनि़नानवारे यांनी गायकवाड यांना ताब्यात घेतले़ यावेळी पोलिसांनी गायकवाड यांचे प्राण वाचविणा-या तरुणांचे कौतुक केले़ यावेळी श्याम कोकाटे, सत्यवान अंभोरे, गजानन कोकाटे, गणेश कोकाटे, सचिन कोकाटे, पवन कोकाटे, साईप्रसाद जाधव, राजेश पवार, दत्ता पवार, भाऊ पवार, राजू कोकाटे यांची उपस्थिती होती़
निराशेतून प्रकार
गायकवाड हे नांदेडातच खताच्या दुकानावर कामगार होते़ परंतु त्यातून आर्थिक प्रश्न सुटत नसल्यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून निराश होते़
गुरुवारी गळफास घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला़ परंतु या ठिकाणी असलेल्या तरुणांनी प्रसंगावधान राखत वेळीच धाव घेवून त्यांचे प्राण वाचविले़