जाती-पातीचे राजकारण जनता हाणून पाडेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 12:47 AM2019-04-15T00:47:05+5:302019-04-15T00:47:36+5:30
पाच वर्षे सत्तेत राहिल्यानंतर विरोधकांनी नांदेडसाठी काय केले? हे सांगायला हवे. मात्र जनतेचे खरे मुद्दे टाळून प्रचारसभांत निराधार टीकाटिप्पणी केली जात आहे. नांदेड जिल्ह्याचा खऱ्या अर्थाने विकास कोणी केला? याची मतदारांनाही जाणीव आहे.
नांदेड : पाच वर्षे सत्तेत राहिल्यानंतर विरोधकांनी नांदेडसाठी काय केले? हे सांगायला हवे. मात्र जनतेचे खरे मुद्दे टाळून प्रचारसभांत निराधार टीकाटिप्पणी केली जात आहे. नांदेड जिल्ह्याचा खऱ्या अर्थाने विकास कोणी केला? याची मतदारांनाही जाणीव आहे. या निवडणुकीत मतदार जाती-पातीचे राजकारण हाणून पाडतील, असा विश्वास व्यक्त करीत काँग्रेसचा विजय निश्चित असल्याचे अशोकराव चव्हाण म्हणाले.
जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात विविध समाजघटकांशी चव्हाण यांनी रविवारी संवाद साधला. यावेळी व्यंकट मुदीराज, दीपाली मोरे, बालाजी मद्देवाड, छगन पाटील, सिद्धेवर पिटलेवार, बालाजी बोईनवाड, शेख गफार, रमेश यादव आदींची उपस्थिती होती. मुख्यमंत्री असताना आदिवासी कोळी तसेच भोई समाजबांधवांच्या हिताचे अनेक निर्णय घेतल्याचे सांगत इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता तुमच्या प्रश्नांची सोडवणूक केली जाईल, असा शब्द चव्हाण यांनी दिला. आदिवासी विरुद्ध मन्नेरवारलू आणि आदिवासी विरुद्ध कोळी असा विनाकारण वाद निर्माण केला जात असल्याचेही ते यावेळी म्हणाले. विद्यमान भाजप सरकार दलित, अल्पसंख्याकांच्या विरोधातील आहे. त्यामुळे या सरकारविरोधात मतदानाच्या माध्यमातून आवाज उठवा, असे आवाहनही त्यांनी केले. भोकरमधील लघळूदमध्ये समाजबांधवांचा खून होतो. परंतु अद्यापही त्याचा तपास लागला नसल्याचे सांगत या सरकारच्या काळात पोलीस यंत्रणाही कुचकामी ठरल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. या सरकारला मतदानाच्या माध्यमातून धडा शिकवा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी आदिवासी कोळी समाज, भोई समाज, मच्छीमार संघटना तसेच ख्रिस्ती बांधवांनी चव्हाण यांना जाहीर पाठिंबा देत काँग्रेसच्याच पाठीशी राहणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी या संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
अख्खी भाजपा भेदरली
नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांच्यासह पियुष गोयलसह अख्खी भाजपाची नेतेमंडळी नांदेडमध्ये येते. यावरुन भाजपा किती भेदरलेली आहे हे स्पष्ट होते. मात्र हे नेते येवूनही त्यांचा उपयोग होणार नाही. कारण जिल्ह्याचा विकास कोणी केला? याची जाणीव नांदेडकरांना आहे. कामे आम्ही करायची आणि श्रेय दुसरे लाटणार हे आता चालणार नाही, असेही ते म्हणाले.