नांदेडकरांनी अपक्षांना धुडकावलेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:27 AM2019-04-11T00:27:50+5:302019-04-11T00:28:56+5:30
समाजकारणात वावरताना राजकारणात उतरण्याची ओढ सर्वांनाच लागते. त्यातूनच आपणही कधी ना कधी निवडणूक लढवावी, ही आंतरिक इच्छा कार्यकर्त्यांची असतेच. ज्या पक्षात काम करतो
अनुराग पोवळे।
नांदेड : समाजकारणात वावरताना राजकारणात उतरण्याची ओढ सर्वांनाच लागते. त्यातूनच आपणही कधी ना कधी निवडणूक लढवावी, ही आंतरिक इच्छा कार्यकर्त्यांची असतेच. ज्या पक्षात काम करतो त्या पक्षाकडे तशी मागणीही केली जाते. उमेदवारांच्या स्पर्धेत टिकाव न लागल्याने शेवटी बंडाचा झेंडा उभारुन अपक्ष म्हणून रिंगणात उतरणाऱ्या उमेदवारांना नांदेडकरांनी अद्याप स्वीकारले नाही.
नांदेड लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीपासून अपक्ष उमेदवार रिंगणात आहे. या उमेदवारांनी आतापर्यंत विजय मिळवला नसला तरीही आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न नेहमीच केला आहे. १९५१ च्या पहिल्या निवडणुकीत गोविंदराव महाले यांनी अपक्ष निवडणूक लढवत ३९ हजार ११२ मते घेतली होती. १९५७ च्या निवडणुकीत एकही अपक्ष उमेदवार रिंगणात उतरला नाही. अशी स्थिती १९७७ च्या निवडणुकीत राहिली. या निवडणुकीत केशवराव धोंडगे आणि गो. रा. म्हैसेकर यांच्यात थेट लढत झाली. त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी आपला झेंडा रोवला. १९९६ च्या निवडणुकीत तब्बल १८ अपक्ष उमेदवार रिंगणात होते. तर १९९१ मध्ये १५, २००९ मध्ये ११, २०१४ मध्ये १३ अपक्ष उमेदवारांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली होती.
१९५१ पासून झालेल्या १७ निवडणुकीत ८० अपक्ष उमेदवार मात्र एकाही अपक्ष उमेदवाराला नांदेडकरांनी संधी दिली नाही. १९८७ च्या पोटनिवडणुकीत प्रकाश आंबेडकर अपक्ष उमेदवार होते. त्यांचा थेट सामना अशोक चव्हाणांशी झाला होता. ही निवडणूक अशोक चव्हाणांसाठी पहिली लोकसभा निवडणूक होती.
नांदेड लोकसभा मतदारसंघात अपक्षांनी आपली दावेदारी वारंवार सांगितली असली तरी मतदारांनी मात्र त्यांना धुडकावलेच आहे. राष्ट्रीय पक्षाचे उमेदवारच या मतदारसंघातून विजयी झाले आहेत.
यावर्षी सहा अपक्ष उमेदवार रिंगणात
नांदेड लोकसभा मतदारसंघात यावर्षी सहा अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. मागील काही निवडणुकींचा इतिहास पाहता अपक्ष उमेदवार म्हणजे मते खाण्यासाठी उभे केलेले उमेदवार असाच त्यांचा प्रचार झाला. यंदाही अपक्षांचे कोणतेही आव्हान प्रमुख पक्षापुढे नसल्याचेच स्पष्ट चित्र आहे.