सर्वसामान्यांच्या मदतीला धावून येणारा लोकप्रतिनिधी गमावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:17 AM2021-04-11T04:17:38+5:302021-04-11T04:17:38+5:30
संघर्षशील व्यक्तिमत्त्व गमावल्याचे दु:ख - अशोक चव्हाण खांद्याला खांदा लावून काम करणारा सहकारी अंतापूरकर यांच्या रूपाने गमावला आहे. त्यांचे ...
संघर्षशील व्यक्तिमत्त्व गमावल्याचे दु:ख - अशोक चव्हाण
खांद्याला खांदा लावून काम करणारा सहकारी अंतापूरकर यांच्या रूपाने गमावला आहे. त्यांचे अकाली निधन धक्कादायक आहे, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. मागील काही दिवसांपासून त्यांचे आजारपण वाढत होते; परंतु ते संघर्षशील व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. अनेकदा खडतर परिस्थितीवर मात केली. कोरोनातूनही ते बरे झाले होते. त्यामुळे आजारपणातून ते बाहेर पडतील, अशी आशा होती; परंतु दुर्दैवाने काळाने त्यांच्यावर घाला घालून सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय नेतृत्व हिरावून घेतले. अंतापूरकर हे मनमिळाऊ, तसेच संवेदनशील लोकप्रतिनिधी होते. त्यांचा जनसंपर्कही दांडगा होता. आमदार असताना व नसतानाही त्यांनी प्रामाणिकपणे लोकांची कामे केली. त्यामुळेच जनतेने त्यांना दुसऱ्यांदा आमदार केले. चव्हाण कुटुंबाशी त्यांचे संबंध राजकारणापलीकडचे होते. त्यामुळेच त्यांच्या निधनाने मी सहकारीच नव्हे, तर एक कौटुंबिक स्नेही गमावल्याचे सांगत चव्हाण यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
मितभाषी आणि शांत स्वभावाच्या लोकप्रतिनिधीला मुकलो- खा. चिखलीकर
देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाच्या वृत्ताने धक्का बसला. अत्यंत शांत स्वभाव, तसेच स्वच्छ चारित्र्य, मितभाषी असलेले हे व्यक्तिमत्त्व देगलूर-बिलोलीकरांच्या विकासासाठी प्रयत्नशील होते. त्यांच्या निधनामुळे जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले असल्याची भावना खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केली आहे. अंतापूरकर परिवारावर कोसळलेल्या दु:खात चिखलीकर परिवार, तसेच जिल्हा भारतीय जनता पार्टी सहभागी असल्याचे सांगत चिखलीकर यांनी रावसाहेब अंतापूरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.
साधा-सरळ राजकारणी गमावला- भास्करराव पाटील
काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाने साधी राहणी आणि सरळ विचारसरणी असलेले नेतृत्व गमावल्याचे दु:ख असल्याचे माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर यांनी म्हटले आहेत. अंतापूरकर हे राजकारण न करता मतदारसंघाच्या विकासासाठी काम करणारे नेते होते. अंतापूरकर यांचा तसा राजकीय पिंड नव्हता. ते वीज मंडळात अभियंता होते. २००९ मध्ये देगलूर मतदारसंघ राखीव झाला होता. तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी या मतदारसंघासाठी उमेदवार निवड करण्यासाठी व निवडून आणण्याची जबाबदारी माझ्यावर टाकली होती. अंतापूरकर हे या मतदारसंघाच्या विकासासाठी शेवटपर्यंत कार्यरत राहिले. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.