घरासमाेरील खड्ड्यांसाठी ‘अण्णांचे’ चक्क ग्रामपंचायतीकडे बाेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:21 AM2021-09-22T04:21:35+5:302021-09-22T04:21:35+5:30
नांदेड : आपल्या घराच्या अगदी समाेरील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांंसाठी आमदारांनी चक्क ग्रामपंचायतीकडे बाेट दाखवून ग्रामपंचायत कशी निष्क्रिय आहे, हे ...
नांदेड : आपल्या घराच्या अगदी समाेरील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांंसाठी आमदारांनी चक्क ग्रामपंचायतीकडे बाेट दाखवून ग्रामपंचायत कशी निष्क्रिय आहे, हे ओरडून सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी आमदाराच्या घरासमाेरच एवढे माेठे खड्डे असतील, तर त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील एकूण विकासाची अवस्था काय असेल, याची कल्पना येते, असा सूर मतदारांमधून ऐकायला मिळताे आहे. विष्णुपुरी ग्रामपंचायत व परिसर हा नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचा भाग आहे. विष्णुपुरी येथे काळेश्वर मंदिर असल्याने भाविकांची सतत गर्दी असते. त्यातही साेमवारी व श्रावण महिन्यात ही गर्दी अधिक वाढलेली असते. विष्णुपुरी येथील माेठ्या कमानीमधूनच काळेश्वर मंदिराकडे जाणारा मार्ग आहे; परंतु या कमानीत एन्ट्री करताच या मार्गावर रस्त्याला ठिकठिकाणी भले माेठे भगदाड पडल्याचे दिसते. कमानीतून आत जाणाऱ्या प्रत्येकालाच या रस्त्यावरील खड्ड्यांचा सामना करावा लागताे. पावसाळ्यात तर प्रचंड त्रास हाेताे. या खड्ड्यांमुळे दुचाकी वाहने घसरून पडल्याने अपघातही घडले आहेत. नांदेड उत्तरचे आमदार माेहनअण्णा हंबर्डे यांनासुद्धा या खड्ड्यांचा त्रास सुटलेला नाही. विशेष असे, हे सर्व खड्डे खुद्द आमदारांच्या अगदी घरासमाेरील रस्त्यांवर पडलेले आहेत. त्यामुळे साहजिकच या रस्त्यांवरून ये- जा करणाऱ्यांना आमदारांकडून या रस्त्याची डागडुजी हाेण्याची, तेथे नवा रस्ता बांधला जावा, अशी रास्त अपेक्षा हाेती. जनतेतील ही कुजबुज आमदार व त्यांच्या कार्यकर्त्यांपर्यंत पाेहाेचलीसुद्धा. मात्र, आमदारांनी लक्ष दिले नाही. अखेर ‘लाेकमत’ने आमदारांच्या घरासमाेरील रस्त्यावर पडलेल्या या खड्ड्यांचा नकाशा जनतेच्या दरबारात मांडला. तेव्हा आमदाराने काहीशी आदळआपट करत या रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी थेट विष्णुपुरी ग्रामपंचायतीकडे बाेट दाखविले. हा परिसर ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने तेथील पदाधिकारी- प्रशासनाला जाब विचारावा, असा आमदारांचा प्रत्यक्ष सूर हाेता. आठवडा लाेटूनही रस्त्यावरील हे खड्डे ना आमदारांनी बुजविले ना ग्रामपंचायतीने. कुरघाेडीच्या स्थानिक राजकारणामुळे जनतेला मात्र हाेणारा त्रास कायम आहे.
आमदार आपल्या मतदारसंघातील विविध ग्रामपंचायतींना विकास निधी देतात. मग त्यांनी विष्णुपुरी ग्रामपंचायतीलाच किमान आपल्या घरासमाेरील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी का देऊ नये, असा मुद्दा उपस्थित केला जात आहे. एकूणच जनतेला त्रास झाला तरी चालेल; पण स्थानिक राजकीय हेव्यादाव्यांमध्ये माघार घ्यायची नाही, अशीच एकंदर भूमिका आमदारांची दिसून येते. त्यामुळे जनतेमध्ये त्यांच्या प्रती राेष पाहायला मिळताे.
चाैकट....
आमदाराचा परिसर हाच मतदारसंघाचा आरसा
काेणत्याही खासदार, आमदार, मंत्री व इतर पदाधिकाऱ्यांनी किमान आपला रहिवासी परिसर सुस्थितीत करून घेणे, तेथील विकासकामे मार्गी लावणे जनतेला अपेक्षित असते. बहुतांश या नेत्यांचा रहिवासी भाग हाच जणू मतदारसंघाचा आरसा असताे; परंतु नांदेड उत्तर मतदारसंघाच्या आमदाराच्या घरासमाेर रस्त्याला माेठमाेठे खड्डे पडले असतील तर न्याय काेणाकडे मागावा, असा पेच जनतेपुढे निर्माण झाला आहे. आमदाराच्या घराच्या परिसरातील एकूण स्थितीवरून नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात रस्ते व इतर विकासाची काय अवस्था असेल याचा अंदाज जनतेतून बांधला जात आहे.