प्लास्टिक बंदीमुळे पारंपारिक पत्रावळी व्यवसायाला जीवनदान
By नामदेव भोर | Published: March 18, 2018 01:42 PM2018-03-18T13:42:27+5:302018-03-18T13:42:27+5:30
लग्न समारंभ, बारसं, घरगुती कार्यक्रमांच्या जेवणावळीसाठी माहुली झाडांच्या पानांच्या पत्रावळी वापरल्या जातात. मात्र, काळानुरूप प्लॅस्टिकच्या पत्रावळींमुळे पारंपरिक पत्रावळी व्यवसाय धोक्यात आला होता. गुढीपाडव्यापासून राज्य सरकारने प्लॅस्टिकवर बंदी घातल्यामुळे पारंपरिक व्यवसायाला जीवनदान मिळणार असून, पत्रावळी व्यावसायिकांनी प्लॅस्टिकवरील बंदीच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
नाशिक : गावाकडे लग्न समारंभ, बारसं, घरगुती कार्यक्रमांच्या जेवणावळीसाठी माहुली झाडांच्या पानांच्या पत्रावळी वापरल्या जातात. मात्र, काळानुरूप प्लॅस्टिकच्या पत्रावळींमुळे पारंपरिक पत्रावळी व्यवसाय धोक्यात आला होता. गुढीपाडव्यापासून राज्य सरकारने प्लॅस्टिकवर बंदी घातल्यामुळे पारंपरिक व्यवसायाला जीवनदान मिळणार असून, पत्रावळी व्यावसायिकांनी प्लॅस्टिकवरील बंदीच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. पारंपरिक पत्रावळीची जागा प्लॅस्टिक पत्रावळींनी घेतल्याने ग्रामीण भागासह शहरातल्याही गृहोद्योगांमधील पत्रावळी बनविण्याचे प्रमाण कमी झाले होते. किमतीने कमी आणि वापरण्यास सोपी असलेली प्लॅस्टिक पत्रावळी बाजारपेठेत सहज उपलब्ध होऊ लागल्याने पारंपरिक व्यावसायिकांनाही या व्यवसायात उतरणे अपरिहार्य झाले होते. त्यामुळे अविघटनशील अशा प्लॅस्टिकचा वापर वाढल्याने प्रदूषणाची समस्याही वाढली असतानाच पारंपरिक व्यवसाय नामशेष होण्याच्या मार्गावर होता. अशास्थितीतच शासनाने पुन्हा एकदा राज्यात प्लॅस्टिकवर बंदीचा निर्णय जाहीर केल्याने गेल्या अनेक पिढय़ांपासून सुरू असलेल्या पारंपरिक पत्रवळीच्या व्यवसायाला पुनर्जीवन मिळाल्याची प्रतिक्रिया पत्रावळी विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. ग्रामीण भागात पत्रावळीचा व्यवसायय करणारे विलास पवार म्हणाले, पारंपरिक पत्रवळीसाठी सर्व कच्चा माल जवळच मिळत असल्याने खर्चाची गरज नसते. घरची कामे उरकून पत्रवळ्या बनविता येत असल्याने माणूस अडकत नाही. ज्यांना पत्रवळ्यांची गरज आहे, अशा व्यक्ती गावातच येऊन पत्रवळ्या विकत घेतात. त्यामुळे बाजारपेठेत जाण्याचाही खर्च नसतो. उर्वरित पत्रवळ्या शहरातील बाजारपेठेत विकल्या जात असल्याने शहरी नागरिकांनाही सहज पत्रावळी उपलब्ध होते. तर 10 ते 15 वर्षापूर्वी पारंपरिक पत्रवळी उद्योग तेजीत होता. शहरातील प्रमुख व्यावसायिकांसोबतच ग्रामीण भागातील शेकडो कुटुंब या व्यवसायावर उदरनिर्वाह करीत होते. त्यामुळे गेल्या 9-10 वर्षापूर्वी प्लॅस्टिकच्या पत्रावळीवर विक्रेत्यांनी बंदी घालण्याची मागणी केली होती, अशी प्रतिक्रिया शहरातील पत्रावळी विक्रेता विशाल व्यावहारे यांनी व्यक्त केली असून सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याचेही म्हटले आहे. आता उशिरा का होईना सरकारला सुचलेले शहानपण या व्यवसायाला निश्चित जीवनदान देणारे ठरणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
पारंपरिक व्यवसायाला नवसंजीवनी
प्लॅस्टिक आणि थर्माकॉलपासून तयार केलेल्या पत्रावळ्यांचे नैसर्गिक विघटन होत नाही. यामुळे प्रदूषणामध्ये जास्त वाढ होते. प्लॅस्टिकचा वापर कमी करण्यासाठी शासनाकडून अटोकाट प्रयत्न केले जात असताना माहुलीच्या पानांपासून तयार केलेल्या पारंपरिक पत्रवळी उद्योगाकडे मात्र दुर्लक्ष होत होते. या उद्योगाला शासनाकडूनही पाठबळ मिळत नव्हते. परंतु, सरकारने प्लॅस्टिकबंदीचा निर्णय घेतल्याने या व्यवसायाला नवसंजीवनी मिळाली आहे.