महिला बचत गटातून कर्ज घेऊन टरबुजाची केली लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:17 AM2021-02-14T04:17:16+5:302021-02-14T04:17:16+5:30
कुंटूर - येथील तरुण व शिक्षित जोडप्याने आपल्या शिक्षणाच्या जोरावर स्वतःच्या एक एकर जमिनीमध्ये टरबुजाची लागवड करून त्यामध्ये एक ...
कुंटूर - येथील तरुण व शिक्षित जोडप्याने आपल्या शिक्षणाच्या जोरावर स्वतःच्या एक एकर जमिनीमध्ये टरबुजाची लागवड करून त्यामध्ये एक लाख ८० हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले. कुंटूर येथील विठूमाउली महिला बचतगटाचे सदस्य असलेल्या दैवशीला शिवाजी अडकीने व त्यांचे पती शिवाजी आडकीने या तरुण जोडप्याने टरबुजाची लागवड करण्याचे मार्गदर्शन घेतले. त्यानुसार आपल्या एक एकर क्षेत्रात त्यांनी टरबूज पिकाची लागवड केली.
लागवडीसाठी पैशाची अडचण भासली. त्यामुळे दैवशीला अडकिने यांनी विठूमाउली गटाकडे कर्जाची मागणी केली. त्यांना बँकेकडून कर्ज प्राप्त झाले. त्या कर्जातून त्यांनी आपल्या शेतीसाठी लागणारा सर्व खर्च भागविला. दिवस-रात्र शेतामध्ये मेहनत घेतली. ३५ टन टरबूज पिकातून त्यांनी १ लाख ८० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. आजघडीला त्यांनी आपल्या मेहनतीच्या व जिद्दीच्या जोरावर गरिबीवर मात करून इतरांसमोर उदाहरण ठेवले आहे.
विठू माउली महिला बचतगटात दर महिन्याला शंभर रुपये बचत करतात. त्या बचतीतून त्यांना बँकेकडून कर्ज मिळते. त्या कर्जातून त्यांनी शेतीसाठी लागणारे साहित्य व त्यासाठी लागणारे उत्पन्न कसे काढता येईल याचा मार्ग शोधून टरबुजाची लागवड करण्याचे ठरवले. त्यांनी संतोष सांगवीकर या कृषी दुकानदाराकडून मार्गदर्शन घेतले. चांगल्या वाणाची निवड करून आपल्या शेतात पॉलिथीनचा वापर करून टरबुजाची लागवड केली. स्वतःचा बोर असल्यामुळे पाण्याची व्यवस्था होती. त्यामुळे त्यांनी आधुनिक पद्धतीचा वापर करत मेहनत करून विक्रमी उत्पन्न मिळवले.